भाजपचा नाद सोडला! एकनाथ खडसेंनी घेतला मोठा निर्णय

नवी मुंबई : मी आता भाजपमध्ये (BJP) जाणार नाही. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचेच काम करणार असल्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून तळ्यात मळ्यात असलेले खडसे यांची भूमिका अखेर स्पष्ट झाली आहे.*आपला भाजप (BJP) प्रवेश झाल्यास मंत्री गिरीश महाजन आणि अन्य काही नेते व मंत्री भाजपमधून बाहेर पडणार होते, असा गौप्यस्फोटही खडसे यांनी यावेळी केला. भाजपचे नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम करत असताना उत्तर महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी एकनाथ खडसे यांच्या खांद्यावर भाजपने दिली होती. भाजपचे मातब्बर नेते म्हणून खडसे यांनी ओळख निर्माण केली. मात्र, पक्षांतर्गत मतभेदामुळे एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात पक्षप्रवेश केला. त्यानंतर शरद पवार यांनी खडसे यांची विधान परिषदेवर वर्णी लावली. मात्र, काही महिन्यांनंतर खडसे यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. यासाठी काही भाजपच्या नेत्यांनी मध्यस्थी केली होती.*भाजपच्या नेत्यांचा थेट राजीनामा देण्याचा इशारा*भाजप (BJP) प्रवेशाच्या मुहूर्तासाठी खडसेंची दिल्लीवारीदेखील झाली. त्यानंतर त्यांना भाजपात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर पक्षप्रवेश केला जाईल, असा निरोप त्यांना देण्यात आला. खडसेंच्या विरोधात कारवाया करणार्‍यांची नाकेबंदी झाली. खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसे यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि केंद्रीय राज्यमंत्री झाल्या. त्यामुळे एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश निश्चित असल्याचे मानले जात होते. मात्र, भाजपच्या काही नेत्यांनी आणि मंत्र्यांनी थेट राजीनामा देण्याचा इशारा दिला आणि खडसेंचा पक्षप्रवेश रखडला. *भाजपमध्ये प्रवेश देता येणार नाही, असा निरोप पोहोचला*विधानसभेआधी हा पक्षप्रवेश होईल, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. मात्र, राजीनाम्याच्या इशार्‍यामुळे एकनाथ खडसेंना भाजपात (BJP) पक्षप्रवेश देता येणार नसल्याचा निरोप खडसेंपर्यंत पोहोचला आणि थेट खडसेंनी भाजपात पक्षप्रवेश करणार नाही, असा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे जिल्ह्यांसह जळगाव, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर, यावल, रावेर, शिरपूरसह खांदेशातील मतदारसंघात भाजपचे गिरीशभाऊ विरोधात नाथाभाऊ असा चुरशीचा सामना रंगणार यात शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button