किरण उर्फ भैय्या सामंत यांच्याकडून कॅन्सर ग्रस्त परीच्या उपचारासाठी मदतीचा हात!
राजापूर हातीवले येथील, मूळ गाव, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील परी प्रसाद माळवदे या चार वर्षीय मुलीला ब्लड कॅन्सर असल्याने ती सध्या पुणे येथे भारती मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे उपचार घेत आहे. तिची आई प्रगती प्रसाद माळवदे या माहेर हून राजापूर खडपेवाडी (आडनाव कोळेकर) येथील आहेत. त्यांचे एक घर हातीवले येथे सुद्धा आहे. सदर कुटुंब हे सध्या पुणे येथे नोकरीसाठी वास्तव्यास आहे. त्यांचे नातेवाईक मानसी मंजुनाथ शेडी या राजापूर हातिवले येथे राहतात. त्या शिवसेना महिला संघटनेचे काम करतात. त्यांनी सदर मुलीच्या आजाराबाबत किरण उर्फ भैय्या सामंत, शिवसेनेच्या युवा नेत्या अपूर्वा किरण सामंत आणि शिवसेना पदाधिकारी यांच्याकडे विषय मांडला. त्यानंतर शिवसेना पदाधिकारी यांनी पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे स्विय सहाय्यक यांच्याकडे विषय मांडला. यानंतर तात्काळची मदत म्हणून किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या माध्यमातून थोडीशी आर्थिक मदत करण्यात आली आहे. तसेच पुणे येथे देखील जलद गतीने उपचार होण्यासंदर्भात ना. उदय सामंत यांचे स्विय सहाय्यक देखील प्रयत्न करत आहेत. सदर आर्थिक मदतीचा धनादेश उपजिल्हा प्रमुख अशपाक हाजू यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच परीच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी कोंड्ये पंचायत समिती उपविभाग प्रमुख अजित घाणेकर, संदीप राऊत, प्रतीक सप्रे, सूरज मोरे आदी उपस्थित होते. किरण उर्फ भैय्या सामंत हे नेहमीच आरोग्याच्या संदर्भात सतत गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे करत असतात. अशीच एक मदत त्यांनी या परीसाठी केली आहे. या मदतीबद्दल मानसी मंजुनाथ शेडी यांनी आभार मानले आहेत.