ई-वाहन निर्मात्यांना सरकारी अनुदान यापुढे नको – गडकरी

* नवी दिल्ली : विद्युतशक्तीवरील वाहनांच्या (ईव्ही) निर्मितींना यापुढे सरकारने अनुदान देण्याची गरज नाही आणि त्यावर त्यांची मदारही असू नये, असे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी येथे प्रतिपादन केले. ग्राहकच आता स्वतःहून ‘ईव्ही’ किंवा ‘सीएनजी’वर चालणाऱ्या वाहनांना प्राधान्य देत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.*ई-व्ही निर्मितीचा खर्च अधिक होता आणि त्या तुलनेत त्या वाहनांना मागणीदेखील कमी होती. मात्र आता ‘ईव्हीं’ची मागणी वाढल्याने उत्पादन खर्च आधीच्या तुलनेत कमी झाला आहे. यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांना यापुढे अनुदानाची गरज नसल्याचे गडकरी म्हणाले. शिवाय विद्युत वाहनांवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) हा पेट्रोल-डिझेलवरील कराच्या दरापेक्षा कमी आहे. या कारणामुळेदेखील कंपन्यांनी अनुदान मागणे समर्थनीय ठरत नाही.सध्या, हायब्रिड इंजिनद्वारे चालणाऱ्या वाहनांवर २८ टक्के आणि ई-वाहनांवर ५ टक्के जीएसटी आकारला जातो. जीवाश्म म्हणजेच पारंपरिक इंधनाकडून, पर्यायी व हरित इंधनाकडे वळणे हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार आणि ऊर्जेची गरज लक्षात घेता एक महत्त्वाचे संक्रमण असेल. लिथियम-आयन बॅटरीच्या किमतीत आणखी कपात होत असल्याने ई-वाहनांची किंमत कमी होईल, असे मतही गडकरी यांनी व्यक्त केले.*किंमत लवकर समान पातळीवर*येत्या दोन वर्षांच्या कालावधीत डिझेल, पेट्रोलवरील वाहने आणि ई-वाहनांच्या किंमती सारख्याच असतील. सुरुवातीच्या काळात ई-वाहनांच्या किमती जास्त होत्या, त्यामुळे त्यांना बाजारात टिकवून ठेवण्यासाठी उत्पादकांना अनुदान देण्याची गरज होती. या अनुदान योजना पुढे चालू ठेवण्याची गरज उरली नसल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button