दादर-रत्नागिरी सुरू करण्यासाठी प्रवासी एकवटले, कोकणात जाणारी गाडी बंद करून यूपीची गाडी!

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या गर्दीने भरून धावत असताना कोकणातील एक्स्प्रेस बंद करून उत्तर प्रदेशातील गाडी चालवण्याचा घाट घातला आहे. दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली असून त्यावेळेत आता कायमस्वरूपी दादर-गोरखपूर रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. दादरवरून थेट रत्नागिरीला जाणारी रद्द केलेली रेल्वेगाडी सुरू करण्याच्या मागणीसाठी प्रवासी एकवटले आहेत.

रत्नागिरी ते लोकमान्य टिळक टर्मिनस मार्गावर एक पॅसेंजर १९९६-९७ पासून सुरू झाली. पुढे प्रवाशांच्या मागणीनुसार ती रत्नागिरी-दादर पॅसेंजर म्हणून चालवली जाऊ लागली. मार्च २०२० पर्यंत ही गाडी प्रवाशांच्या सेवेत होती. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, उत्तर मुंबई, वसई, नालासोपारा, विरार आणि गुजरात दिशेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दादर स्थानक सोयीचे असल्यामुळे आणि दिव्यापुढे सर्व स्थानकांवर थांबत असल्यामुळे ही गाडी सर्वाधिक लोकप्रिय होती. परंतु, करोना साथीच्या कालावधीत मध्य रेल्वेने सप्टेंबर २०२१ पासून ही गाडी सुरू करताना मार्गाची क्षमता नसल्याचे आणि वक्तशीरपणाचे कारण देत बंद केली. त्यानंतर नवीन शून्य आधारित वेळापत्रकात दिवा-रत्नागिरी पॅसेंजर सुरू केली. परंतु, रत्नागिरी पॅसेंजरच्या वक्तशीरपणात सुधारणा झाली नाही.

आता नव्या वेळापत्रकात या गाडीच्या वेळेत दादर-गोरखपूर गाडी धावणार आहे.दिवा ते दादर मार्गाची क्षमता नसल्याचे कारण देणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने त्याच मार्गावर दादर-गोरखपूर (चार दिवस) आणि दादर-बालिया (तीन दिवस) विशेष रेल्वेगाड्या (दैनिक) सुरू केल्या. १ जानेवारी २०२५ पासून लागू झालेल्या नवीन वेळापत्रकात या रेल्वेगाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच या रेल्वेगाड्या आता कायमस्वरूपी झाल्या आहेत, असे कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी सांगितले.

या रेल्वेगाड्यांच्या दादर येथून सुटण्याच्या व पोहोचण्याची वेळ ही दादर-रत्नागिरीच्या पूर्वीच्या वेळेप्रमाणे नाही तर वेगळी आहे. त्यामुळे या रेल्वेगाड्या व आताची दिवा-रत्नागिरी यांचा संबंध जोडला जाऊ शकत नाही. *– प्रवीण पाटील, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button