
आशादीप मतिमंद संस्थेचे संचालक दिलीप रेडकर यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा गौरव पुरस्कार जाहीर
रत्नागिरी : रत्नागिरी येथील आशादीप मतिमंद मुलांच्या पुनर्वसनाचे गेली 20 वर्षे अविरत काम करणारे समाज भूषण श्री. दिलीप रेडकर यांना मनुष्यबळ विकास अकादमीचा राज्यस्तरीय गुणरत्न गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. मतिमंद मुलांच्या संगोपनाबरोबरच त्यांच्यामधील कला कौशल्याला वाव देऊन स्वयंरोजगाराद्वारे आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करण्याचे सामाजिक कार्य आशादीप संस्थेतर्फे गेली २० वर्षे श्री. दिलीप रेडकर अविरत करीत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची नोंद शासन पातळीवर घेण्यात येऊन त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे समाज भूषण पुरस्कार देऊन यापूर्वीच सन्मानित करण्यात आले आहे.
याखेरीज त्यांना कोकण भूषण पुरस्कार विजय नारकर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार रत्नदुर्ग माउंटेनियर्सचा 2019 चा पुरस्कार अशा विविध पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या या कार्याचा विविध स्तरावर गौरव झालेला आहे. आता या नवीन पुरस्काराने संस्थेच्या यशात मानाचा तुरा खोवला गेला आहे. श्री. दिलीप रेडकर हे कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद असून त्यांचे या पुरस्काराबद्दल कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.