शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 15-16 कोटींचं बजेट मंजूर, पण जयदीप आपटेने पुतळा फक्त 15 लाखांत बनवला, बाकीचे पैसे कुठे गेले? संजय राऊतांचा सवाल!

मुंबई : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांचं बजेट मंजूर केले होते. मात्र, प्रत्यक्षात हा पुतळा तयार करण्यासाठी 15 ते 16 लाख रुपये लागले असावेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण पुतळ्यासाठी 15 ते 16 कोटी रुपयांचे बजेट मंजूर झाले होते. मग हे बाकीचे पैसे कुठे गेले काय माहिती, असे वक्तव्य करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर आणखी एक गंभीर आरोप केला. ते आज बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.*शिवाजी महाराजांचा हा पुतळा साकारणारा जयदीप आपटे पोलिसांना का सापडत नाही, हे सरकारने सांगावे. पोलिसांनी जयदीप आपटे याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली, याचा अर्थ तो पोलिसांच्या हाती लागत नाही. मग गृहखाते काय करत आहे? जयदीप आपटे महाराष्ट्रातून पळून गेला असेल तर या सरकारने त्याला मदत केली आहे. तो महाराष्ट्रातच असेल तर मग त्याच्याकडे लपण्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा असेल. मंत्रालयाचा सहावा मजला आणि वर्षा बंगल्यावर गुंड दिसल्याचे अनेक फोटो मी यापूर्वी समोर आणले आहेत. मग जयदीप आपटेही अशाच सुरक्षित जागी लपला असेल. तसं नसेल तर मग जयदीप आपटेला अटक करा, असे आव्हान संजय राऊत यांनी महायुती सरकारला दिले.*बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न*कोलकाता येथे एका डॉक्टर तरुणीवर अत्याचार झाला तेव्हा भाजपच्या गुंडांनी तब्बल 15 दिवस राज्यातील कायदा-सुव्यवस्था हातात घेतली होती. भाजपचे ते आंदोलन राजकीय होते. मात्र, ममता बॅनर्जी यांनी आरोपीला अटक केली, त्याच्यावर कारवाई झाली आणि महिला अत्याचार रोखण्यासाठी कायदाही केला. मात्र, महाराष्ट्रात भाजप बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातली आरोपांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. बदलापूरच्या शाळेचे अध्यक्ष आणि संचालक हे आपटे आणि कोतवाल आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊनही त्यांना अटक झालेली नाही. तसेच शाळेतील सीसीटीव्ही फुटेज कोणी गायब केले? आपला शिपाई वाचवण्यासाठी की आणखी कोणत्या कारणांमुळे आरोपींना सरकारकडून मदत केली जात आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.*लाडकी बहीण योजनेवरुन संजय राऊतांचं टीकास्त्र*संजय राऊत यांनी महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर टीकास्त्र सोडले. राज्यातील विद्यार्थी, शेतकरी आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी राजकीय कारणांसाठी फक्त एका योजनेकडे वळवला जात आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button