मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निवडणुकीनंतरच्या संख्याबळावर घेतला जाईल-शरद पवार.
महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याची घोषणा केली जावी अशी मागणी केली जात असल्याचं दिसून आलं आहे. स्वत: उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात अनेक उघडपणे मागणी केल्याचं दिसून आलं आहे. किमान चार भिंतींच्या आतमध्ये तरी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी काही आठवड्यांपूर्वी महाविकास आघाडीच्या घटकपक्षांकडे केली होती. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सूचक विधान करताना उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचं म्हटलं होतं.मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबद्दल बोलताना शरद पवारांनी, “आताच मुख्यमंत्रिपदाचं नाव जाहीर करावं असा आमचा आग्रह नाही,” असं विधान केलं आहे. तसेच पुढे बोलताना, “मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबद्दल आता बोलणं योग्य नाही,” असंही शरद पवार म्हणाले. मुख्यमंत्रिपदासाठी आताच चेहरा देण्याची गरज वाटत नाही, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. सध्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचं उद्दीष्ट हे स्थिर सरकार देण्याला असेल असं पवारांनी स्पष्ट केलं आहे. “लोकांच्या पाठींब्यानंतर एक स्थिर सरकार देऊन. स्थिर सरकार देणं महत्त्वाचं आहे. स्थिर सरकार देणं आमचं उद्दीष्ट आहे,” असं शरद पवार म्हणाले. तसेच निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाबद्दल निर्णय कसा घेतला जाईल याबद्दल बोलताना शरद पवारांनी, “मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निवडणुकीनंतरच्या संख्याबळावर घेतला जाईल,” असं शरद पवारांनी सांगितलं आहे.