
चष्म्यापासून मुक्ती, मुंबईतील फार्मा कंपनीच्या Eyedrops ना केंद्राची मंजुरी; अवघ्या 15 मिनिटात दिसेल परिणाम
नियमित चष्मा लावणाऱ्या लाखो-कोटी जनतेसाठी एक चांगली बातमी आहे. मुंबईतील एका फार्मा कंपनीने एका अनोख्या आयड्रॉपची निर्मिती केली आहे. या आयड्रॉपमुळे तुम्हाला चष्म्यापासून मुक्ती मिळेल. विशेष म्हणजे भारताच्या ड्रग रेग्युलेटरी एजन्सीने या आयड्रॉपसाठी परवानगी दिली आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापर्यंत या आयड्रॉपची तपासणी पूर्ण केल्यानंतर याला परवानगी देण्यात आली आहे.*मुंबईतील एन्टोड फार्मास्यूटिकल्सने मंगळवारी पिलोकार्पाइनचा उपयोग करीत तयार केलेली प्रेस्वू आय ड्रॉप लॉन्च केली आहे. हे औषध डोळ्यांचा आकार कमी करून ‘प्रेस्बिओपिया’वर उपचार करते. या पद्धतीमुळे कोणतीही गोष्ट जवळून पाहण्यास मदत मिळते. प्रेस्बिओपियाची स्थिती वयाशी संबंधित आहे आणि जवळच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची डोळ्याची क्षमता कमी होण्यावर काम करते.*सहा तासांपर्यंत प्रभाव राहील…*एन्टोड फार्मास्यूटिकल्सचे सीईओ निखिल मसुरकर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, एक थेंब टाकल्यानंतर 15 मिनिटांत परिणाम दिसून येईल. याचा प्रभाव पुढील सहा तासांपर्यंत राहील. पहिला ड्रॉप टाकल्यानंतर तीन तासांच्या आत दुसरा ड्रॉप टाकला तर याचा प्रभाव अधिक कालावधीपर्यंत राहील. ते म्हणाले, आतापर्यंत अंधुक, जवळच्या गोष्टींसाठी चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर केला जात आहे. काहीवेळा शस्त्रक्रियेच्या पर्यायाचा अवलंब केला जात होता. *कधीपर्यंत होईल उपलब्ध?*एन्टोड फार्मास्यूटिकल्स या कंपनीने आतापर्यंत आय, ईएनटी आणि त्वचेसंबंधित औषध तयार केली आहेत. याशिवाय 60 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून प्रिस्क्रिप्शन आधारित या आयड्रॉप्स 350 रुपयांपर्यंत मेडिकलमध्ये उपलब्ध होतील. हे औषध 40 ते 55 वर्षे वयोगटातील लोकांसाठी सौम्य ते मध्यम प्रेस्बिओपियाच्या उपचारांसाठी देता येईल. मसुरकर यांचा दावा आहे की, हे औषध भारतातील अशा प्रकारचे पहिलेच आहे ज्याची चाचणी भारतीय डोळ्यांवर करण्यात आली आहे आणि भारतीय लोकसंख्येच्या अनुवांशिक आधारानुसार अनुकूलित केले गेले आहे.