प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन -लघाटे सध्या पारंपरिक गणेशमूर्ती बनवण्याच्या कामात मग्न.
काही वर्षांपूर्वी सारेगमप लिटिल चॅम्पमधून प्रसिद्धी मिळून घराघरात पोहचलेला प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन -लघाटे सध्या पारंपरिक गणेशमूर्ती बनवण्याच्या कामात मग्न झाली आहेत. पूर्ण लघाटे कुटुंबीयच मूर्तीकामात दंग झालेले पाहायला मिळत आहे. केवळ अर्थार्जन डोळ्यासमोर ठेवून नाही तर गणेशमूर्ती निर्मितीची १०० वर्षांची परंपरा जोपासण्याचे काम लघाटे कुटुंबीय करत आहे.गणेशोत्सव काही दिवसांवर आल्याने लघाटे यांच्या गणेशमूर्ती कारखान्यात लगबग पाहायला मिळत आहे. आरवली येथील लघाटेबंधूंच्या गणेशमूर्ती कारखान्याला १००हून अधिक काळाचा इतिहास आहे. सुबक, आकर्षक, दर्जेदार मूर्तिकाम म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात (कै.) भार्गव काशिनाथ उर्फ अण्णा लघाटे यांनी गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू केलेअण्णा लघाटे यांनी सुरू केलेल्या या गणेशमूर्ती कारखान्याची परंपरा आज प्रथमेशच्या पिढीतही तितकीच मेहनतीने जोपासली जात आहे. या कामी त्यांना शांताराम लघाटे, श्रीराम लघाटे व प्रथमेशचे वडील उमेश लघाटे यांनी सहकार्य केले. उमेश लघाटे हे मूर्तीचे सफाईदार कोरीवकाम, डोळ्यांची रेखणी गेली २५ वर्षे समर्थपणे सांभाळत आहेत. अनिल लघाटेदेखील नोकरी सांभाळत मूर्तिकला जोपासत आहेत.संगीतक्षेत्रात आघाडीवर असताना सतत व्यस्त असूनही प्रथमेश लघाटे आवड व कलेची निस्सीम सेवा म्हणून मूर्तिकाम करत आहे. प्रथमेशच्या जोडीनेच यावर्षी मुग्धा लघाटे ही लघाटे कुटुंबीयांची परंपरा पुढे नेताना दिसत आहे.