शिवप्रेमींनी मुख्याधिकार्यांना धारेवर धरले, पुतळ्यांच्या तोडफोड प्रकरणी नगरपरिषदेचे उद्यान पर्यवेक्षक निलंबित.
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील शिवसृष्टीत उभारण्यात आलेल्या मावळ्यांच्या पुतळ्याच्या तोडफोडीवरून वातावरण तापले आहे रत्नागिरीशहरात उभारलेल्या पुतळ्यांच्या जबाबदारी कोणाची? एवढे प्रकार घडले तरी तुम्हाला जाग येत नाही.. तुम्ही काही घडावं याची वाट पाहताय का? तात्काळ उद्यान पर्यवेक्षकाला निलंबित करा अन्यथा याच ठिकाणी उद्रेक होईल, असा इशारा हिंदूत्ववादी संघटनांनी दिल्यानंतर मारुती मंदिर येथील मावळ्यांच्या तोडफोड प्रकरणी उद्यान पर्यवेक्षकाला २ दिवस निलंबित केल्याचे घोषणा मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केली आणि नगर परिषदेत छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दणाणून गेला.मारुती मंदिर येथील शिवसृष्टीमध्ये असलेल्या मावळ्यांची तोडफोड केल्यानंतर त्याच्या संतप्त प्रतिक्रिया सर्वत्र उमटू लागल्या. शिवप्रेमी संघटनांनी थेट पोलीस स्थानकात धाव घेतली आणि पोलिसांचे सीसीटीव्ही सुरू केव्हा होणार? अशी विचारणा केली. मात्र मारुती मंदिर परिसरात नगर परिषदेची जबाबदारी आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आणि संतप्त जमाव नगर परिषदेत येऊन धडकला.नगर परिषदेत दाखल झाल्यानंतर शिवप्रेमींना मुख्याधिकार्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्याधिकारी जेवणाकरीता निघून गेले होते. शिवप्रेमींनी मुख्याधिकार्यांना फोन केला व तुम्ही जेवण उरकून तात्काळ या, असे फोनवरून सांगितले.सारेजण मुख्याधिकार्यांची वाट पाहत मुख्य दरवाजाबाहेर उभे होते. जेवण आटपून मुख्याधिकारी नगर परिषदेत दाखल झाले. त्यांनतर मुख्याधिकार्यांच्या केबिनमध्ये चांगले घमासान पहायला मिळाले. तू-तू, मै-मै सुरू असतानाच शिवप्रेमींनी मुख्याधिकार्यांना धारेवर धरले.यावेळी संतप्त शिवप्रेमींनी मुख्याधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही पुतळे उभारता आणि १० हजारचा साधा सीसीटीव्ही तुम्हाला सुरक्षेसाठी लावता येत नाही, ही जबाबदारी नेमकी कुणाची आहे? असा सवाल संतप्त शिवपे्रेमींनी केला.मध्यरात्रीच्यावेळी ही घटना घडली. हा प्रकार संतापजनक आहे. याचे पडसाद तीव्र उमटले असते. ही घटना घडूनदेखील पुतळे झाकून ठेवणे गरजेचे होते. मात्र ही जबाबदारी नेमकी कुणाची आहे? हेच तुम्हाला कळले नाही, तुम्ही काय काम करता? तुमचे कर्मचारी कुठे असतात? असा सवाल यावेळी करण्यात आला.ही घटना उघडकीस आल्यानंतर सकाळच्यावेळी नगर परिषदेचे उद्यान निरीक्षक नितीन यादव यांना संपर्क साधण्यात आला. मात्र त्यांनी कुणाचेच फोन घेतले नाहीत. ना ते घटनास्थळी दाखल झाले. एवढा मुजोर कर्मचारी कशाला हवा? त्यांना जबाबदार्या कळत नसतील तर त्यांना घरी बसवा असे म्हणत यादव यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली.कुणाच्याही मनात आले की लगेच शहरात पुतळे उभे राहतात. रत्नागिरीकरांची मागणी नसताना असे पुतळे का उभारले जातायत? यापुढे रत्नागिरीत एकही पुतळा उभारू नका. तुम्हाला पुतळ्यांना सुरक्षा देता येत नसेल तर शहरातील सर्व पुतळे आमच्या ताब्यात द्या, आम्ही सीसीटीव्ही स्वखर्चाने बसवतो, असे संतप्त शिवप्रेमींनी मुख्याधिकार्यांना सांगितले. संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच सार्यांनीच उद्यान पर्यवेक्षकांच्या निलंबनाचा विषय लावून धरला होता. जोपर्यंत तुम्ही त्यांचे निलंबन करत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही, असा इशाराच शिवप्रेमींनी दिला. यावेळी अनेकांनी प्रश्नांचा भडीमार केला. संतप्त जमावाची आक्रमकता पाहून अखेर मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी उद्यान पर्यवेक्षक नितीन यादव यांना २ दिवसांसाठी निलंबित केल्याचे जाहीर केले. तसेच याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करून पुढील अहवालानंतर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.यावेळी मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी १ लेखी पत्र दिले आहे. २४ तासांत शहरातील पुतळ्यांजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील तसेच पुतळ्यांच्या सुरक्षेसाठी २४ तास सुरक्षा रक्षक तैनात केले जाणार असल्याचे बाबर यांनी शिवप्रेमींना सांगितले व तसे पत्र शिवप्रेमींना दिल्यानंतर घोषणाबाजी करत शिवप्रेमी कार्यालयातून बाहेर पडले.