
मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर विरोधात गुन्हा दाखल; अटकपूर्व जामीन मंजूर
खेड : मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्या विरोधात खेड पोलिस ठाण्यात मागासवर्गीय निधीच्या गैरवापर प्रकरणी अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांनी खेड अतिरिक्त सत्र न्यायालयात केलेला अटक पूर्व जमीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे, अशी माहिती त्यांच्या वतीने विधीज्ञ आश्विन भोसले यांनी शनिवार दि.५ रोजी प्रसिध्दी माध्यमांना दिली आहे.
दि. २३ फेब्रुवारी २०१५ रोजी वैभव सदानंद खेडेकर यांनी जिल्हाधिकारी यांना खेड तालुक्यातील भरणे बाईतवाडी ते बौध्दवाडी रोटरी शाळेकडील रस्त्यावर नदीपलिकडे जाण्याचा साकव मंजूर करावा असे पत्र दिले होते. नदीपलिकडे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत आहे. पावसामध्ये विद्यार्थी तसेच नागरिकांना येण्यासाठी पर्यायी मार्गाची उपलब्धता नाही, असे पत्रात नमूद केले होते. भरणे बाईतवाडी ते बौध्दवाडी येथे विशेष घटक योजने अंतर्गत साकव बांधणीच्या संदर्भात त्यांच्याकडे प्राप्त तक्रारीबाबत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, रत्नागिरी यांनी तपासणीसाठी कार्यालया अंतर्गत ३१ सदस्यीय समिती गठीत केलेली होती . त्या समितीने दिनांक २० ऑक्टोबर २०२१ रोजी भरणे येथील साकव बांधकामाची संबंधित ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष उपस्थित संयुक्तपणे स्थळ पाहणी करून अहवाल दिला. सदर साकवाचा उपयोग भडगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामधील सहा अनुसूचित वस्त्यांना तसेच भरणे ग्रामपंचायत क्षेत्रातील एका अनुसुचित वस्तीला होत नसून भरणे ग्रामपंचायतीने खोटा प्रस्ताव सादर करून सार्वजनिक बांधकाम विभागाची दिशाभूल केली असल्याचे कळविले होते . दि . २६ सप्टेंबर २०२२ रोजीच्या शासन पत्रानुसार भडगांव – भरणे बाईतवाडी येथील साकव बांधणीमध्ये वैभव खेडेकर , खेड यांनी स्वतःच्या इमारतीकरिता जाण्यासाठी जागेचा व पदाचा स्वतःच्या फायद्याकरिता अधिकाराचा गैरवापर करून शासनाची दिशाभूल व फसवणूक केली. साकव बांधकामाबाबत विशेष घटक योजनेच्या २० लाख रुपये निधीचा दुरुपयोग केला म्हणून समाज कल्याण विभाग रत्नागिरी सहायक आयुक्त यादव इरबा गायकवाड यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वैभव खेडेकर यांनी खेड अतिरिक्त न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जावर शनिवार दि. ५ रोजी सुनावणी झाली. त्याबाबत माहिती देताना खेडेकर यांच्या वतीने बाजू मांडणारे विधीज्ञ आश्विन भोसले यांनी सांगितले की, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सचिन बारी यांनी खेडेकर यांच्या विरोधात राजकीय व फौजदारी गुन्हे दाखल असल्याने जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली होती. परंतु खेडेकर यांच्या वतीने आम्ही केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून खेडेकर यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.