
चिपळूण शहरातील महावीर पॅलेस, भोगाळे येथे अनधिकृत बांधकाम केले म्हणून डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल.
चिपळूण शहरातील महावीर पॅलेस, भोगाळे येथे डॉ. संभाजी परशराम गरुड यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ५२ व ५३ नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर २०२२ पासून ते आजतागायत डॉ. संभाजी गरुड यांनी महावीर पॅलेस या इमारतीमध्ये कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता पत्र्याचे शेड, जिन्याचे बांधकाम, पाण्याची टाकी, युटिलिटी आणि कपाटाचे बांधकाम केल्याचा आरोप आहे.
चिपळूण नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी प्राधिकृत केल्यानंतर, फिर्यादी विजय बबन गमरे (वय ३०, व्यवसायः नोकरी, वरिष्ठ महाराष्ट्र प्रादेशिक व लिपिक, नगरपालिका चिपळूण) यांनी आज १७ जून २०२५ रोजी सायंकाळी ५.०२ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात येऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर गु.र.नं. १४३/२०२५ अन्वये डॉ. संभाजी गरुड यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे