
रत्नागिरीच्या पवित्र भूमीतील जातीय सलोखा टिकवा. नाना पाटेकर.
रत्नागिरी, ता. ३१ : आम्ही कोणता पक्ष ओळखत नाही, आम्ही पाहतो तो विकास. उदयजी तुम्ही कमावलेली माणसं हीच तुमची पोचपावती आहे. रत्नागिरीला मिळालेला तू छान मुलगा आहेस. खोटं काही दाखवले नाहीस, यात समाधान आहे. प्रत्येक राजकीय नेत्याने आपला अहवाल दिला पाहिजे. जातीय सलोखा टिकवा, रत्नागिरीबाबत कोणतीही कलुषित बातमी नाही. ही पवित्र भूमी आहे, तिला धक्का लावू देऊ नका, अशा शब्दात अभिनेते नाना पाटेकर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे कौतुक केले. येथील वि. दा. सावरकर नाट्यगृहात आयोजित उदय पर्व अहवालाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि मानवतावादी विचारवंत रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटे, आण्णा सामंत, मुन्ना सुर्वे, उद्योजक दीपक गद्रे, श्रीरंग कद्रेकर आदी उपस्थित होते. नाना पाटेकर म्हणाले, मला हा सोहळा पाहून छान वाटलं. माझी जात ही कलावंताची आहे. ५० वर्षे झाली या क्षेत्रामध्ये काम करत आहे. रत्नागिरी माझे आजोळ आहे. उदयला मी सांगितले होते, जो विकास केला आहे तो दाखवा. मी व्यासपिठावर खोटं बोलणार नाही; परंतु त्यांनी जे झाले ते दाखवल्याचे समाधान आहे. असा कार्य अहवाल सर्व राजकीय नेत्यांनी दिला पाहिजे. त्यांनी काय केले ते समजायला हवे. १५ नद्यांचा गाळ काढण्यासाठी करारनाम फाउंडेशन आणि जलसंपदा विभागामध्ये या वेळी सामंजस्य करार झाला. जिल्ह्यातील १५ नद्यांचे रूंदीकरण आणि गाळ काढण्यात येणार आहे तसेच एमआयडीसीतील १० भूखंड विविध सामाजिक संस्थांना देण्यात आले. अभिनेते नाना पाटेकर यांनी चिठ्ठ्या काढून भूखंडांचे वाटप करण्यात आले.