आज महाविकास आघाडी मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन.
आज महाविकास आघाडी मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन केलं जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या नेतृत्वात मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन केलं जात आहे. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत हा मोर्चा सुरु आहे. शरद पवार आणि छत्रपती शाहू महाराज हे काही वेळ मोर्चामध्ये चालले. त्यानंतर गाडीतून हे दोघे गेट वे ऑफ इंडियाकडे रवाना झाले आहेत. गेट वे ऑफ इंडिया परिसरात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजयांच्या पुतळ्याला अभिवादन करत मोर्चा संपेन. यावेळी महाविकास आघाडीचे नेते संबोधित करतील.छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान… त्यांचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही, असं म्हणत महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरलं आहेत. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष केला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असं म्हणत शेकडो कार्यकर्ते गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाले आहेत.आधी या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मात्र आज रविवारचा दिवस आहे. या भागातील कार्यालयांना सुट्टी आहे. असं असताना आमच्या आंदोलनाला परवानगी का नाही? असा सवाल महाविकास आघाडीने केला. त्यानंतर हा मोर्चा अडवला जाणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. लावलेले बॅरिगेटही हटवण्यात आले आहेत. हा मोर्चा आता गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला. डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं. पण उद्घाटनानंतर केवळ आठच महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यानंतर महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या. महाविकास आघाडीने या घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला आहे