
शिरगाव – शिवरेवाडी रस्ता तातडीने दुरुस्त करा- सामाजिक कार्यकर्ते तन्मय दाते यांची मागणी.
रत्नागिरी : गणपती उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे; मात्र शहराजवळील शिरगाव-शिवरेवाडी येथील रस्त्याची डागडुजी केलेली नाही, ही बाब लक्षात घेऊन ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते तन्मय दाते यांनी या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. सरपंच यांच्या वतीने ग्रामविकास अधिकारी वासुदेव सावके यांनी हे निवेदन स्वीकारले. श्री. दाते यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मी शिरगांव ग्रामस्थ असून शिवरेवाडी येथील प्रमुख रहदारीचा रस्ता गेले सहा ते सात महिने दुरावस्थेत आहे, रस्त्याला खड्डे की खड्डयात रस्ते हेच कळेनासे झाले आहे.आगामी गणेशोत्सव हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी लवकरात लवकर रस्ता खड्डे मुक्त करावा, अशी मागणी केली.दरम्यान, शिरगाव ग्रामपंचायतीचे उप सरपंच अल्ताफ संगमेश्वरी यांनी या निवेदनाची दखल घेतली असून, गणपतीपूर्वी रस्ता खड्डेमुक्त करणार आहे, तसेच डिसेंबरपर्यंत संपूर्ण रस्त्यावर चांगल्या दर्जाचे डांबरीकरण केले जाईल, अशी ग्वाही दिली.