राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न रत्नागिरी, दि.३०-(जिमाका): शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत जिल्हा अंधत्व नियंत्रण व दृष्टिक्षीणता कार्यक्रमांतर्गत ३९ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्ताने रत्नागिरी शहरात नेत्रदान जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक अरुणकुमार जैन हे प्रमुख पाहुणे म्हणून आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुमरे, वैद्यकीय महाविदयालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विनोद सांगवीकर, प्रशासकीय अधिकारी डॉ. सुतार, वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तमराव कांबळे, नेत्र शल्यचिकित्सक डॉ. वनिता कानगुले, डॉ.सुनिल ढोखळे, अधिसेविका श्रीमती शिरधनकर व जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, नर्सिंग स्कूलच्या शिक्षिका श्रीमती वासावे व नर्सिंग विद्यार्थीनी, आशा स्वयंसेविका, यश फांऊंडेशनच्या विद्यार्थींनी उपस्थित होत्या. केवळ नेत्रदान प्रतिज्ञापत्र न भरता ज्यावेळी आपल्या कुटुंबातील व्यक्ती दुर्दैवाने निधन पावल्यास त्यावेळी इतर नातेवाईकांनी मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा. पहिल्या तासांत जिल्हा रुग्णालय यांचेशी संपर्क साधला तर सहा तासांच्या आत नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडून दोन अंध व्यक्तीना दृष्टिदान देवून अंधकारमय जीवन प्रकाशमान करु शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त जनतेने आपल्या नातेवाइकांचे मरणोत्तर नेत्रदान करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले.संपूर्ण देशात गेली ३८ वर्ष नेत्रदान पंधरवडा साजरा करुनही मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर वगळता इतर जिल्हयामध्ये नेत्रदानाचे प्रमाण अत्यल्प आहे. अंधश्रध्दा, रुढी पंरपरा, गैरसमजामुळे मयत व्यक्तीचे नातेवाईक मरणोत्तर नेत्रदान करण्याकरीता तयार होत नाहीत. एका व्यक्तींच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते. व्यक्ती निधन पावल्यानंतर संपूर्ण राख व माती होत असते. पंरतु मरणोत्तर नेत्रदान केले तर डोळे हे जिवंत राहू शकतात ही संकल्पना घेऊन नेत्रदान जनजागृती येत आहे. नेत्रदान पंधरवडयानिमित्त यश फांऊंडेशनच्या विद्यार्थी/विद्यार्थींनी नेत्रदानविषयक माहितीपर पथनाटय सादर केले. जिल्हयात कोणालाही मरणोत्तर नेत्रदान करावयाचे असल्यास जिल्हा अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे नोडल अधिकारी संदीप उगवेकर मो. ९४०५४९६१०९ व नेत्रदान समूपदेशक राम चिंचोळे मो.८२०८८५२१८८ यांचेशी संपर्क करावा.