राणेपुत्राच्या दहशतीमुळे गावी जाणेही नकोसे झाले! मुस्लिम कुटुंब भीतीच्या छायेत; हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल!
सिंधुदुर्ग जिह्यातील भाजप आमदार नितेश राणे यांची गुंडगिरी निदर्शनास आणून देत मुस्लिम दाम्पत्याने गुरुवारी उच्च न्यायालयात तसे प्रतिज्ञापत्र दाखल केले. कोर्टाच्या आदेशानंतरही नितेश राणेंच्या गुंडांनी सिंधुदुर्गातील गावातील घरावर दगडफेक केली.त्यांच्या दहशतीमुळे गावी जाणे नकोसे झाले, असे म्हणणे मुस्लिम दाम्पत्याने प्रतिज्ञापत्रातून मांडले. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने 6 सप्टेंबरला पुढील सुनावणी घेण्याचे निश्चित केले.*19 जानेवारी 2024 रोजी कणकवली येथून मडगाव एक्प्रेसने मुंबईला येत असताना असिफ शेख व त्यांच्या कुटुंबीयांना तरुणांच्या ग्रुपने ‘जय श्रीराम’ बोलण्यासाठी धमकावले. याचदरम्यान असिफ यांच्या मुलीच्या चेहऱ्यावर चहा फेकला. याप्रकरणी असिफ यांनी पनवेल पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. ती तक्रार नंतर राजकीय दबावातून कणकवली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. पुढे मारहाण तसेच घरावर दगडफेक करण्यात आली. या घटना घडूनही पोलीस तपासात पक्षपाती वागले, याकडे लक्ष वेधत असिफ शेख व त्यांच्या पत्नी जस्मिन शेख यांनी अॅड. गौतम कांचनपूरकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांच्या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. खंडपीठाने मागील सुनावणीवेळी दिलेल्या आदेशानुसार असिफ शेख यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आणि नितेश राणे व त्यांच्या गुंडांकडून घरावर दगडफेक, धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले.*प्रतिज्ञापत्रात काय म्हटलेय?*उच्च न्यायालयाने 31 जुलै 2024 रोजी दिलेल्या आदेशानंतर 2 ऑगस्ट रोजी असिफ शेख यांच्या वरवडे येथील घरावर काही जणांनी दगडफेक केली. इतकेच नव्हे तर दोन दिवसांनी 4 ऑगस्ट रोजी चेंबूर येथील घरात एक अज्ञात इसम घुसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.8 ते 11 ऑगस्ट या कालावधीसाठी शेख कुटुंबीय गावी जाणार होते. गावात जाण्यासाठी न्यायालयाने पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले होते, मात्र गावकऱ्यांनी तेथील परिस्थितीमुळे गावात न येण्याचा सल्ला दिला. नितेश राणेंच्या दहशतीमुळे गावी जाणे नकोसे झाले आहे.*संपूर्ण घटनाक्रम गंभीर; कोर्टाने फुटेज मागवले*न्यायालयाने प्रतिज्ञापत्राची दखल घेतली आणि संपूर्ण घटनाक्रम गंभीर असल्याचे मत नोंदवत पोलिसांना लक्ष घालण्याचे तसेच 25 जानेवारी रोजीचे कणकवली पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे आदेश दिले. यासाठी सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी वेळ मागितला. त्यानुसार खंडपीठाने पुढील सुनावणी आठवडाभरासाठी तहकूब केली.