
८ वर्षाच्या नीलने धाडस दाखवत ६ वर्षाच्या मुलाला पाण्याबाहेर काढले.
स्विमिंग टँकजवळ खेळत असताना अचानक तोल जावून पाण्यात पडलेल्या सहा वर्षाच्या मुलाला त्याच्यासोबतच खेळणार्या आठ वर्षाच्या नीलने मोठ्या धाडसाने पाण्याबाहेर काढत जीवदान दिले. एवढ्या लहान वयात त्याने दाखवलेल्या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.राजापूर तालुका असोसिएशनचे सहावे फॅमिली गॅदरिंग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका रिसॉर्टमध्ये २५ जानेवारी रोजी पार पडले. या स्नेहसंमेलनासाठी राजापुरातील सर्व वकील आपल्या कुटुंबियांसमवेत त्या रिसॉर्टमध्ये गेले होते. सायंकाळी हा कार्यक्रम सुरू असताना त्यांच्यासोबत गेलेली त्यांची लहान मुले एका बाजूला खेळत होती. या मुलांपैकी ऍड. अभिषेक ढवळे यांचा सहा वर्षाचा मुलगा रूद्र आणि ऍड. सुशांत पवार यांचा आठ वर्षांचा मुलगा नील खेळता खेळता जवळच असलेल्या स्विमिंग पुलाजवळ गेले.
स्विमिंग पुलाच्या काठावर बसून पाण्यात चेंडू तसेच पोहण्यासाठी ट्यूब टाकत असताना रूद्र याचा तोल गेला आणि तो स्विमिंग पूलमध्ये पडला. स्विमिंग पुलमध्ये सुमारे पाच ते सहा फूट पाणी होते. त्यामुळे रूद्र पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. यावेळी काठावर असलेल्या नील सुशांत पवार याने क्षणाचाही विलंब न लावता काठावरून रूद्र याला हात देत पाण्याबाहेर खेचले. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी रूद्र आणि नील या दोघांव्यतिरिक्त कोणीही नव्हते.
अगदी या दोघांचे आई-वडिल त्याचबरोबर सर्व वकील मंडळी स्नेहसंमेनात व्यस्त होती. या सर्वांना जेव्हा ही घटना समजली तेव्हा त्यांचाही थरकाप उडाला. रूद्रच्या आई-वडिलांसाठी तर नील हा एखाद्या देवदूतासारखा धावून आला होता.www.konkantoday.com