
चंपक मैदान येथे घडलेल्या युवतीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींना त्वरीत अटक करून त्यांची नावे जाहीर करा -भाजपाची मागणी
रत्नागिरी जिल्ह्यातील सीसीटीव्हींच्या देखभाल व दुरूस्तीकडे लक्ष देण्याबाबत तसेच चंपक मैदान येथे घडलेल्या युवतीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींना त्वरीत अटक करून त्यांची नावे जाहीर करावीत, अशा मागण्यांचे निवेदन रत्नागिरी भाजपच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. अन्यथा भाजपतर्फे वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.चंपक मैदानावरील घटना घडून सुमारे ६० तासांचा अवधी उलटला असला तरी नराधम आरोपींसंदर्भात कोणतीही माहिती अजून मिळाली नसल्याचे यात म्हटले आहे. भारतीय जनता पार्टी रत्नागिरी म्हणून आज आम्ही आपणास आरोपींना त्वरीत अटक करून त्यांची नावे जाहीर करावीत अशी विनंती करत असून, याकामी विलंब होत असेल, तर अन्यथा भाजपातर्फे वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असे या निवेदनात नमूद केले आहे. ही दोन्ही निवेदने भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना दिली आहेत.