
ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना चांगल्या सेवा- पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि. 28 (जिमाका): रत्नागिरीमध्ये कॅशलेस हॉस्पिटल होत असून, या रुग्णालयात अकरा शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. गाव, तालुक्याच्या ठिकाणी तेथील रुग्णांसाठी आरोग्याची सेवा असणे गरजेचे आहे. डॉक्टरांविषयी जनमानसात अस्मिता निर्माण करणे गरजेचे आहे. डॉक्टरांची जनसेवक अशी प्रतिमा समाजात असणे गरजेची आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना चांगल्या सेवा पुरविल्या जातील, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.* देवरूख ग्रामीण रूग्णालयाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ. अनिरूध्द आठल्ये, जिल्हा शल्य चिकीत्सक डाँ. भास्कर जगताप, राहूल पंडीत, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संदीप माने, गटविकास अधिकारी भरत चौगुले, डॉ देवकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 32 डॉक्टर सेवा देत आहेत, त्यामुळे सर्जरींची संख्या वाढलेली आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटन वेळी इमारत स्वच्छ आहे. तशी कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी येथील कर्मचाऱ्यांची आहे. लोक डॉक्टरांकडे विश्वासाने बघत असतात. ग्रामीण रुग्णालयात चांगले डॉक्टर देण्याची व्यवस्था लवकरच केली जाणार असून येथील रुग्णांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी पालकमंत्री सामंत यांनी सांगितले. त्याबरोबर अपंगांचे दाखले घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. देवरूख मधील ग्रामीण रूग्णालय आता रुग्णासाठी खुले होणारं आहे. रूग्णालयात ज्या ज्या सेवा आवश्यक आहेत, त्या देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे, असे आमदार शेखर निकम यांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालयात डायलेसिस युनिट, सोनोग्राफी मशीनची मागणी करण्यात येणार असल्याचे कार्यक्रमाचे प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भास्कर जगताप यांनी सांगितले.