
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एक आठवडा मासेमारी बंद राहिल्यामुळे हर्णै, आंजर्ले बंदरातील सुमारे चार कोटीची उलाढाल ठप्प
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एक आठवडा मासेमारी बंद राहिल्यामुळे हर्णै, आंजर्ले बंदरातील सुमारे चार कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे.मासेमारीला १ ऑगस्टपासून सुरवात झाली; मात्र आरंभीलाच चार दिवस वादळसदृश वातावरणामुळे हर्णै बंदरातील मच्छीमारांनी ६ ऑगस्टपासून मासेमारीला सुरवात केली. हर्णै बंदरातील किमान ४०० नौका या मासेमारीला समुद्रात उतरल्या. २२ ऑगस्टपर्यंत चांगली मासळी मिळत होती; परंतु दर पाहिजे तसा मिळत नव्हता. ना नफा ना तोटा अशी व्यावसायिक स्थिती असतानाच २३ ऑगस्टपासून वादळाने तोंड वर काढले. दक्षिणेकडून वेगवान वारे वाहण्यास सुरवात झाली आणि मच्छीमारांची तारांबळ उडाली. हर्णैतील काही मच्छीमार जयगड खाडीत तर काही मच्छीमार मुंबईत आणि काहींनी दाभोळ खाडीत सुरक्षेसाठी आसरा घेतला. वाऱ्याला वेग असल्यामुळे समुद्र खवळला असूनजाळीदेखील पाण्यात टाकता येत नव्हती. खोल समुद्रात अजस्त्र लाटा उसळत आहेत. मच्छीमारांनी जवळच्या सुरक्षित बंदरांचा व खाडीकिनाऱ्यांचा आसरा घेतला आहे. सुमारे १५० ते २०० नौका जयगड खाडीत तर १०० नौका दिघी खाडीत, १०० नौका दाभोळ खाडीत आणि साधारण २५ नौका आंजर्ले खाडीत उभ्या आहेत.