तुमच्या नोकऱ्या नाही घालवल्या तर भास्कर जाधव नाव नाही सांगणार , आमदार भास्कर स्थानिक अधिकाऱ्यांवर जाधव भडकले जिल्हाधिकाऱ्यांना अधिवेशनात खेचण्याचाही इशारा
चिपळूणमध्ये 75 फूट ध्वजस्तंभ लोकार्पण सोहळ्यात शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांचा पारा चढला. भास्कर जाधव या कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचले होते.मात्र पालकमंत्री उदय सामंत आणि शासकीय अधिकाऱ्यांना उशीर झाला होता. त्यामुळे भास्कर जाधव चांगलेच चिडले आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमोर शासकीय अधिकाऱ्यांना सुनावलं. तुमच्या नोकऱ्या नाही घालवल्या तर भास्कर जाधव नाव नाही सांगणार अशी धमकीच त्यांनी दिली. संतापलेल्या भास्कर जाधवांनी शासकीय कर्मचाऱ्यांना सुनावताना म्हटलं की, “काय प्रांत, काय चाललाय तुमचा कारभार? ही पद्दत आहे का? झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला दीड दीड तास उशिरा येता. राष्ट्राचा काही अभिमान आहे की नाही? तुमचा सरकारी कार्यक्रम आहे की पक्षाचा कार्यक्रम आहे?. तुमची जबाबदारी आहे की नाही? दाखवतोच तुम्हाला माझी ताकद काय आहे ती, अधिकाऱ्यांना घरी नाही पाठवलं तर माझं नाव भास्कर जाधव नाही”.यावेळी त्यांनी उदय सामंत यांच्याकडेही नाराजी व्यक्त करत आम्ही तुमची वाट पाहत बसलोय आणि तुम्ही कार्यक्रम सुरु करता असं म्हटलं. त्यावर उदय सामंत यांनी कार्यक्रम अजून सुरु केला नसल्याचं म्हटलं. दरम्यान कार्यक्रमातील भाषणात उदय सामंत यांनी दिलगिरी व्यक्त केली. प्रत्येकवेळी 12, 18 किंवा 24 तासाची नोटीस मिळते आणि कार्यक्रमाला हजर राहायचं. पालकमंत्री महोदय किमान काही कार्यक्रम अपवाद करा. आजचा कार्यक्रम आगळावेगळा आहे. अधिकाऱ्यांवर चिडण्याचं कारणही तेच आहे. ते बिचारे रात्री येतात आणि साहेब आता कार्यक्रम आला अशी गयावया करतात. पण मी जिल्हाधिकाऱ्यांना अधिवेशनात खेचणार. संविधानाने आम्हालाही काही अधिकार दिले आहेत. हक्कभंग प्रस्ताव मला मांडावा लागेल,” असा इशारा भास्कर जाधव यांनी भाषणात दिला.