महावितरणकडून काजळी नदीच्या खाडी किनाराऱ्यावरील गावांची दिशाभूल, महावितरणावर मोर्चा काढण्याचा इशारा
कुवारबाव उपकेंद्रावरून विद्युत पुरवठा सुरू करण्यात असणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून कायमस्वरूपी विद्युत पुरवठा सुरू करून दिलेला शब्द पाळला नाही, तर तोणदे, सोमेश्वर, हातीस, टेंबे, पोमेंडी काजरघाटी, चिंचखरी या गावांतील वीज ग्राहक एकत्रित येऊन महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन आणि मोर्चा काढून महावितरणला जाब विचारण्याचा निर्णय गावाच्या समन्वय सभेत एकमुखाने घेण्यात आला आहे.शहराजवळील तोणदे, सोमेश्वर, हातीस, टेंबे, पोमेंडी काजारघाटी, चिंचखरी या गावात विजेचा वारंवार लपंडाव सुरू असून अनेकदा गेलेली लाईट दिवस दिवस येत नाही. सुरुवातीचे तीन महिने या त्रासात काढल्यानंतर जुलै महिन्याच्या अखेरीस त्रस्त वीज ग्राहकांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता.महावितरणकडून काजळी नदीच्या खाडी किनाराऱ्यावरील तोणदे, सोमेश्वर, हातीस, टेंबे, पोमेंडी काजारघाटी, चिंचखरी गावातील वीज ग्राहकांची दिशाभूल करत असून, याविरोधात मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. जुलै महिन्यात काजळी नदीच्या खाडी किनाऱ्यावरील तोणदे, सोमेश्वर, हातीस, टेंबे, पोमेंडी, काजारघाटी, चिंचखरी या गावातील लोकांनी एकत्र येऊन विद्युत पुरवठा पानवल उपकेंद्राऐवजी पूर्वीप्रमाणे कुवारबाव उपकेंद्र येथून कायमस्वरूपी देण्यात यावा, अशी मागणी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून केली होती. त्याला महावितरण कडून ३० जुलैपर्यंत मुदत मागून घेण्यात आली होती आणि लेखी आश्वासन देण्यात आले होते की विद्युत पुरवठा कायमस्वरूपी कुवारबाव उपकेंद्रावरून करण्यात येईल; परंतु अजूनही परिसरात विजेचा लपंडाव सुरूच आहे. पाऊस सुरू झाल्यावर वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे याचे मुख्य कारण म्हणजे या गावांना पानवल हे भौगोलिकदृष्ट्या लांबचे उपकेंद्र आहे. त्यामुळे या परिसरातील वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. महावितरणकडून दिलेल्या आश्वासनाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. कार्यालयात वारंवार चौकशी करण्यात आल्यावर अधिकारी एकमेकांवर जबाबदरी ढकलून आपली जबाबदारी टाळत आहेत; तसेच कुवारबाव उपकेंद्रावरून वीजपुरवठा कायमस्वरूपी देण्यास नकारघंटा दाखवण्यात आली आहे.