नोंदीत बांधकाम कामगारांसाठी शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य विषयक लाभ – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, : नोंदीत बांधकाम कामगारांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य विषयक लाभ देण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. या माध्यमातून गरिबांना ताकद देण्याचे काम शासन करीत आहे. या योजनाचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. कामगार विभाग आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई (जिल्हा रत्नागिरी) यांच्यावतीने राजापूर तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना आज पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी वस्तू वाटपाचा कार्यक्रम शिवाजी नाट्यगृह, राजापूर येथे झाला. यावेळी सिंधुरत्न समृध्द योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, प्रांताधिकारी जीवन देसाई, सहाय्यक आयुक्त कामगार संदेश आयरे, परिविक्षाधीन अधिकारी निशिगंधा रसाळ, तहसीलदार शीतल जाधव, सरकारी कामगार अधिकारी राजेश जाधव, माजी नगराध्यक्ष राहूल पंडीत, शिल्पा सुर्वे आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले, कामगार विभागामार्फत मुलांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या विविध योजना राबविल्न्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकांने आपल्या तालुका ठिकाणी दरवर्षी नोंदणी करणे गरजेचं आहे. योजनामधून प्राथमिक शिक्षणासाठी २ हजार ५०० रुपये, ८ ते १० विद्यार्थ्यांसाठी ५ हजार रुपये, १० वी नंतरच्या शिक्षणासाठी २० हजार रुपये, अपघातात मृत्यू झाल्यास ५ लाख, नैसर्गिक मृत्यू झाल्यास २ लाख रुपये, मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये मिळतात. त्यामुळे आपण स्वत: नोंदणी करण्यासाठी तसेच इतरांना, आपल्या शेजाऱ्यांना देखील नोंदणी बाबत सांगण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेतल्यास प्रत्येकाची आर्थिक सुलभता होईल. शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येकांने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. सामंत यांनी केले. माझी लाडकी बहीण योजनेंसदर्भात बोलताना पालकमंत्री म्हणाले, आपला जिल्हा या योजनेमध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात ३ लाख ५० हजार महिलांच्या खात्यात २ महिन्याचे ३ हजार रुपये जमा झाले आहेत. महिलांनी देखील या पैशांचा वापर आपल्या आरोग्य, प्रकृतीसाठी करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सत्यवान शंकर भुते, दत्तगुरु मारुती दांडेकर, श्रावणी विकास गावकर, सचिन विजय भुते यांना यावेळी गृहोपयोगी वस्तू व सुरक्षा संचचे प्रातिनिधिक स्वरुपात पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कुलदीप राजाराम सुर्वे या नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याने तेजस्वी कुलदीप सुर्वे यांना २ लाखांचा धनादेश, विजय अनंत शील यांना त्यांचा मुलगा विनीत शील याच्या उच्च शिक्षणासाठी 60 हजारांचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आयरे यांनी केले.