
आमदार वैभवनाईक यांच्यासह अन्य दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संतप्त बनलेल्या आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य शिवप्रेमींनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयात जात तोडफोड केली होती.या प्रकरणी काल रात्री उशिरा आमदार नाईक यांच्यासह अन्य दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल (सोमवार) दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान कोसळला. या घटनेमुळे शिवप्रेमी संतप्त बनले होते. आमदार वैभव नाईक यांनी घटनास्थळी भेट देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढत तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यानंतर दुपारी आमदार वैभव नाईक यांच्यासह उबाठा गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी यांच्यासह अन्य शिवप्रेमी यांनी मेढा येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात जात कार्यालयातील साहित्याची, खिडक्यांची तोडफोड केली होती. त्यानुसार काल रात्री उशिरा पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिघां विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.