
राजकोट पुतळा प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करणार -पालकमंत्री रवींद्र चव्हाण
* सिंधुदुर्ग दि २६ (जिमाका) मालवणातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारून त्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. आज घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. या घटनेची पूर्ण चौकशी होणार असून या मध्ये दोषी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलेपालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजकोट परिसरात पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार आदि उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले नौदल दिनाच्या निमित्ताने भव्य असा पुतळा उभारण्याची नौदलाची कल्पना होती. नौदलातर्फे हा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात येणार होता परंतु जागेची उपलब्धता नसल्यामुळे राजकोट येथे पुतळा उभारण्याचे अंतिम करण्यात आले. नौदलाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मदत केली. राजकोटच्या आजूबाजूची तटबंदी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात आली. पुतळा उभारण्यासाठी लागणारा निधी राज्य शासनाकडून नौदलाला वर्ग करण्यात आला. पुतळा उभारण्याची सर्व प्रक्रिया नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखे खाली आणि नियंत्रणात पूर्ण झाली. पुतळा उभारणी बाबत निविदे पासूनची सर्व प्रक्रिया नौदलातर्फे पूर्ण करण्यात आलेली आहे. कोकणामधील हवामानाचा परिणाम पाहता खाऱ्या हवेमुळे पुतळ्यासाठी वापरण्यात आलेल्या धातूवर या हवेचा परिणाम होऊन आजची घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत २० ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने नौदलाला पत्र देखील दिलेले होते. जयदीप आपटे यांच्या संस्थेने हा पुतळा उभारलेला आहे. पुतळा उभारण्याचे काम नौदलाकडून त्यांना देण्यात आलेले होते. हे सर्व काम नौदलाच्या देखरेखेखाली पूर्ण झालेले आहे. आज घडलेली घटना सर्व शिवप्रेमींसाठी अत्यंत वेदनादायी आहे. पुतळा उभारणीमध्ये जे कोणी सहभागी असतील त्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. आजच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले.०००००