
मुंबई, ठाणे, पुणे, नवीमुंबईत दहीहंडीचा उत्साह शिगेला; दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज
मुंबई-‘* गो गो गो गोविंदा… गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा…’ असा जयघोष सध्या मुंबईसह संपूर्ण ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यात पाहायला मिळत आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी बांधण्यात आल्या आहेत. तर त्यांना फोडण्यासाठी दहीहंडी पथकांमध्ये चुरस रंगणार आहे. मुंबईत दादरमधील आयडिअल, जांभोरी मैदान, घाटकोपर, आयसी कॉलनी या ठिकाणी मोठ्या दहीहंडी पाहायला मिळत आहे. तसेच यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसेची दहीहंडी, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांच्याही हंड्या उभारण्यात आल्या आहेत. यावेळी लाखो रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.यंदाही दहीहंडी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रक मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरण विषयावरील पथनाट्यही इथे सादर करण्यात येणार आहे. आयडियल बुक डेपो चौकात सेलिब्रेटी हंडी आयोजित करण्यात आली आहे. या ठिकाणी महिला दहीहंडी, अंध व्यक्तींची दहीहंडी, दिव्यांगांची दहीहंडी होणार आहे. मुंबईतील वरळी येथील जांभोरी मैदानात यंदा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे नेते संतोष पांडे यांच्या वतीने परिवर्तन दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. परिवर्तन दहीहंडी उत्सवात “अफजलखान वध” हा देखावा विशेष आकर्षण ठरणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे उपस्थित राहणार आहेत.बोरिवली माघाठणे परिसरात प्रकाश सुर्वे यांची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. यात लाखो रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. या दहीहंडीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कलाकार विकी कौशल, गोविंदा, करिष्मा कपूर, अमृता खानविलकर, नृत्यकलाकार गौतमी पाटील, राधा पाटील यांसह विविध सेलिब्रेटी हजेरी लावणार आहेत. घाटकोपरमध्ये राम कदम यांनी दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, रोहित शेट्टी, सलमान खान, विकी कौशल- कटरीना कैफ, शक्ती कपूर, असराणी, जितेंद्र, जया प्रधा, गणेश आचर्य, टेरेंस लुईस, रेमो फर्नांडिस, सलीम सुलेमान, दानीश गायक, फुकरे टीम, गदर टीम हे कलाकार उपस्थित राहणार आहेत. घाटकोपरमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनेही दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. या दहीहंडीला जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित राहतील. या हंडीत महिला आणि अंध मुलांचे पथक हंडी फोडणार आहे.भाजप आणि शिवराज प्रतिष्ठान मार्फत प्रवीण दरेकर यांनी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते उपस्थित असणार आहेत. प्रताप सरनाईक यांनी यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे प्रो गोविंदाचे आयोजन केलं आहे. या ठिकाणी विश्वविक्रम करणाऱ्या पथकाला 11 लाख रुपये दिले जाणार आहेत. संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर असणार आहेत. मनसेतर्फे ठाण्यात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9.30 जय जवान गोविंदा मंडळ आणि शिवसाई गोविंदा पथक 9 थर रचणार आहे. जय जवान गोविंदा पथकाकडून 10 थर रचून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 10 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाखांच पारितोषिक दिलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दहीहंडी म्हणून ही हंडी प्रसिद्ध आहे. या दहीहंडीला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अवधूत गुप्ते आणि इतर सेलिब्रिटी या दहीहंडी उत्सवात सहभागी होणार आहेत.