भंडारी समाज पुन्हा एकसंघ कसा होईल, समाजाला पुर्नवैभव कसे प्राप्त होईल याचा विचार करणे आवश्यक-केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक

भंडारी मुळचे लढवय्ये, त्यांना हाताशी धरून शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली, भंडार्‍यांनी प्राणप्रणाने महाराजांना साथ दिली. पूर्वी प्रत्येक ठिकाणी भंडारी समाजाचा दबदबा होता. मात्र आता भंडारी समाज आपली ताकद आणि इतिहास विसरत चालला आहे. भंडारी समाज पुन्हा एकसंघ कसा होईल? त्याला पुर्नवैभव कसे प्राप्त होईल याचा विचार होणे काळाची गरज असल्याचे मत केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काढले. ते भंडारी समाजाच्या शहरातील स्वा. सावरकर नाट्यगृह येथे आयोजित महाअधिवेशनावेळी बोलत होते.यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय भंडारी समाजाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, राजीव कीर, रमेश कीर, मिलिंद कीर,एस.बी.मायनाक, पुष्कराज कोले, आशिष पेडणेकर, विवेक नार्वेकर, प्रसन्न आंबुलकर, सुनील भोंगले, राजेश कोचरेकर आदी उपस्थित होते.यावेळी ना. नाईक म्हणाले की, भंडारी समाजात अनेक नररत्ने निर्माण झालीत. सी.के.बोले, दानशूर भागोजीशेठ किर, धनंजय कीर, काकासाहेब सुर्वे आदी नररत्ने या भूमीत निर्माण झालीत.व्यापार, उद्योग, पोलीस, राज्यव्यवस्था, प्रशासन व्यवस्था यांमध्ये भंडारी समाजाचा दबदबा होता. आजही विविध क्षेत्रात भंडारी बांधव चमकत आहेत. परंतू भंडारी समाज आपली ताकद, क्षमता, इतिहास विसरत चालला आहे. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे विस्मरण त्याला होत चालले आहे.भंडारी समाज पुन्हा एकसंघ कसा होईल, समाजाला पुर्नवैभव कसे प्राप्त होईल याचा विचार करणे आवश्यक आहे. भंडारी समाज इतका मोठा आहे की मोठा भाउ या नात्याने इतर समाजाला आधार देण्याची क्षमता आहे. यासाठी प्रथम आपल्याला एकजूट व्हावे लागेल. आपल्यातील झुंजारवृत्ती जागवावी लागेल, सारे मतभेद विसरून समाज एकत्र आला पाहीजे, अशी अपेक्षा नाईक यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी स्मरणिकेचे अनावरणही केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची प्रस्तावना रत्नागिरी तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष राजीव कीर यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. प्रज्ञा तिवरेकर यांनी केले.भंडारी समाजाच्या महा अधिवेशनात बोलताना उद्योजक रमेश कीर यांनी भंडारी समाजासाठी स्वतंत्र ट्रस्ट स्थापन करण्याचा मुद्दा उपस्थित केला. सुरुवातीला शंभर भंडारी बांधवांच्या मदतीने ट्रस्ट उभा करून युपीएससी, एमपीएससी आणि विदेशी भाषा क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना या ट्रस्टच्या माध्यमातून मदत करूया. ही मदत केवळ आणि केवळ मेरिट च्य निकषावर करूया. आपला समाज बलवान, सुदृढ आहेच पण या समाजासाठी वेगळं काहीतरी करूया असा महत्वाचा मुद्दा उद्योजक रमेश कीर यांनी यावेळी उपस्थित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button