त्या घटनेनंतर रत्नागिरीतील वातावरण तणावपूर्ण बनले, संतप्त नागरिकांचे रस्ता रोको पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाहतूक सुरू
रत्नागिरीतील खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या ट्रेनी नर्स वर चंपक मैदान येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर रत्नागिरीतील वातावरण तणावपूर्ण बनले अनेक नागरिकांनी शासकीय रुग्णालयासमोर धाव घेऊन जोपर्यंत आरोपी पकडला जात नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका संतप्त जमावाने घेतली. शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर (सिव्हील हॉस्पिटल) जमलेल्या नागरिकांनी रस्त्यावरच बस्तान मांडले. जयस्तंभाकडे जाणारी तसेच मारूती मंदिरकडे जाणारी दोन्ही बाजूची वाहतूक अडवून ठेवली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर, शहर पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी बसलेल्या जमावाशी चर्चा केली, तसेच तपासासाठी काही वेळाचा अवधी द्यावा, मुलीने दिलेल्या जबानीनुसार, वर्णनानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच आरोपी पकडला जाईल, असे आश्वासन दिले. पोलिसांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर शहरातील वाहतूक पूर्ववत झाली. या घटनेमुळे रत्नागिरीत खळबळ उडाली आहे