
संजय राऊत यांच्यावर न्यायालयाने सुमोटो दाखल करून कारवाई करावी- उद्योग मंत्री उदय सामंत यांची मागणी
महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर याविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर शुक्रवारी (ता. 23 ऑगस्ट) या याचिकेवर सुनावणी पार पडली.सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर नसल्याचे सांगितले आणि त्यामुळे महाविकास आघाडीने हा बंद मागे घेतला. पण या निर्णयामुळे ठाकरे गटाचे काही नेते संतापले आहेत. शनिवारी (ता. 24 ऑगस्ट) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी न्यायालयावर टीका केली. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्याप्रकरणी राऊतांवर न्यायालयाने सुमोटो दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी शिंदे गटाचे नेते, मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.न्यायालयात सरकारचा लाडका याचिकाकर्ता जातो आणि न्यायालय यावर बंदी घालते. सरकार जेव्हा अडचणीत येते तेव्हा हा लाडका याचिकाकर्ता न्यायालयात जातो. न्यायालयाचा आदेश मानणे आपली परंपरा आहे. त्यामुळे आम्ही बंद मागे घेतला, असे खासदार संजय राऊत प्रसार माध्यमांसमोर म्हणाले. त्यामुळे त्यांच्या या विधानातून न्यायालयाच्या निर्णयावर टीका करण्यात आली असे सामंत यांनी म्हटले. ज्यामुळे आता संजय राऊत यांच्यावर न्यायालयाने सुमोटो दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.याबाबत बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठले आहे. विरोधक बदलापूर घटनेचे राजकारण करत आहेत. शरद पवार परिपक्व नेते आहेत. म्हणून त्यांनी ट्विट करत बंद मागे घेण्याचे आवाहन केले. संजय राऊतांनी केलेले विधान न्यायालयावर टीका करण्यासारखे आहे. कोण याचिकाकर्ता आहे, त्यापेक्षा न्यायालयाने काय निर्णय दिला. ते महत्त्वाचे आहे. शरद पवारांनी ट्विट केले, न्यायिक व्यवस्थेचा सन्मान केला. त्यामुळे काही लोकांसमोर पर्याय उरला नाही. म्हणून शेवटच्या टप्प्यात काही लोकांनी पत्रकार परिषदा घेतल्या. न्यायालयाचा अवमान करायचा नसतो. हे त्यांच्यापैकीच एका नेत्याने दाखवून दिले आहे, असे सामंत म्हणाले.तर, कोण न्यायालयात गेले म्हणून न्यायालय निर्णय देत नाही. न्यायालयाला वाटले, न्याय्य बाजू पटली की, न्यायालय निर्णय देते. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात कोण बोलणार असेल तर तो न्यायालयाचा अवमान आहे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा व्यक्ती राजकारणामध्ये सक्रिय आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला जात आहे. संजय राऊत यांच्यावर न्यायालयाने सुमोटो दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी मंत्री उदय सामंत यांनी केली.