
मुंबई, ठाण्यात दहीहंडीच्या उत्सवाला राजकीय आखाड्याचं स्वरुप
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात दहीहंडीच्या उत्सवाला राजकीय आखाड्याचं स्वरुप आलेलं दिसतं. कोणता नेता आपल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात किती लाखांचं बक्षीस देणार याचीच स्पर्धा रंगल्याचं चित्र यावर्षी दिसत आहे. गेल्या काही वर्षांत या उत्सवाचं रुपांतर भव्य इव्हेंटमध्ये झालं हे उघड आहे. हंडी फोडण्याच्या स्पर्धेत नंतर याला साहसी खेळ म्हणून मान्यताही देण्यात आल्यानंतर गेल्या वर्षापासून प्रो गोविंदाचा देखील थरार हा मुंबईत पाहायला मिळतो. यावर्षी या साहसी खेळात जोगेश्वरीच्या जय जवान पथकाने बाजी मारलीय. त्यामुळे शहरात लागणाऱ्या राजकीय दहीहंडी देखील फोडण्यासाठी हे बाळ गोपाळ प्रयत्नशील आहेत.राज्यात आधीच राजकीय वातावरण तापलेलं असताना त्यात निवडणुका तोंडावर आहेत. अशात राजकीय नेत्यांनी दहीहंडी कार्यक्रमांची जोरदार तयारी केली आहे. कुठे लाईव्ह म्युजिक तर कुठे डिजे. तर कुठे सिनेक्षेत्रातील लोक या दहीकाला उत्सवाची शोभा वाढवणार आहेत.राजकीय मंडळींचा दहीकाळा उत्सव आणि आकर्षण यंदा कसं आहे?ठाण्यात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘संस्कृती प्रतिष्ठान’ आयोजित दहीहंडी उत्सवात यंदा पहिले नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे.धारावीत 11 लाख 111 रुपयांची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे.वरळी भाजपची परिवर्तन दहीहंडी यात 50 लाखापेक्षा अधिक बक्षीसं आहेत.दादर शिवसेना उद्धव ठाकरे भाजप यांच्या वतीने दादर परिसरामध्ये दहीहंडी उभारण्यात येणार आहे, यातही लाखोंची बक्षीस आहेत.माटुंगा परिसरात शिवसेना दोन्ही गटांकडून लाखो रुपयांच्या दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत.घाटकोपर येथे आमदार राम कदम हे भारतातली सर्वात मोठी दहीहंडी उभारणार आहेत असा त्यांचा दावा आहे.विक्रोळी मनसे आणि शिवसेना यांच्या वतीने देखील लाखो रुपयांचे बक्षीस असलेल्या दहीहंडी उभारण्यात येणार आहेत.ठाणे येथे सरनाईक यांच्या दहीहंडीप्रमाणेच मनसे अविनाश जाधव, शिवसेना नरेश मस्के नेत्यांमार्फत ठाण्यात मोठ्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे.अंधेरी परिसरात भाजपकडून आणि शिवसेनेकडून दहीहंडी उभारली जाणार आहे यामध्ये देखील लाखो रुपयांची बक्षीसं आहेत.बोरिवली माघाटणे प्रकाश सुर्वे यांची दहीहंडी, लाखो रुपयांची बक्षीस आणि विविध सेलिब्रिटींची एन्ट्री यामध्ये पाहायला मिळणार आहे.या सर्व दही काळा उत्सवामध्ये सेलिब्रिटी, राजकीय मंडळी कलाकार मंडळी उपस्थित राहणार आहेत.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे देखील स्वतः अनेक दहीहंडी आयोजनाच्या इथे बाळ गोपाळांचा उत्साह वाढवण्यासाठी जाणार आहेत.गेल्या महिना दोन महिन्यापासून बाळ गोपाळ उंच उंच थर लावून विक्रम करण्याच्या तयारीत आहेत. राज्य सरकारने गोविंदाच्या विम्यासाठी 18 लाख 75 हजार रुपयांची रक्कम सरकारने मंजूर केली आहे.त्यामुळे यंदा गोविंदा ही बिनधास्तपणे सर्वत्र मनोरे रचण्यासाठी सज्ज तर राजकीय पक्ष ही आगामी निवडणुकीच्या दृष्टीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून मतदारांना साद घालण्यासाठी तयारीत आहेत.