रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकाही शाळेत सुरक्षेच्या दृष्टीने एकही सीसीटीव्ही नसल्याची धक्कादायक बाब समोर
बदलापूर येथील एका शाळेत चिमुकलींवर झालेल्या अत्याचारानंतर राज्यासह जिल्ह्यातील शालेय मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकाही शाळेत सुरक्षेच्या दृष्टीने एकही सीसीटीव्ही नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच शाळांमध्ये शासनाच्या आदेशानुसार सखी सावित्री समितीची स्थापना केली आहेे; परंतु ती कागदावरच राहिली आहे. त्याचबरोबर शासकीय कार्यालयातसुद्धा विशाखा समितीची हीच अवस्था आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. शासनाने सध्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा आदेश काढला आहे. परंतु, याची अंमलबजावणी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. मुळात ग्रामीण भागातील शाळांमध्ये वीजबील भरायला पैसे नाहीत. यामुळे सीसीटीव्हीसाठी पैसे कुठून येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू असतो, हा एक प्रश्न आहे.