
भर पावसात बदलापूर घटनेचा हजारो शिवसैनिकांसह उद्धव ठाकरेनी निषेध नोंदविला
बदलापूर घटनेचे तीव्र पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला होता. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर ठरवत, असा बंद करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.यानंतर महाविकास आघाडीने संप मागे घेतला. परंतु, याविरोधात निदर्शने करणार असल्याचे स्पष्ट केले. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, तर मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे नेते काळी पट्टी लावून निदर्शने केली. उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत यांच्यासह ठाकरे गटाचे अनेक नेते पदाधिकारी यांनी सेना भवन येथे निदर्शने केली.काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली. भर पावसात बदलापूर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी हजारो शिवसैनिक सेना भवनाबाहेर जमले. तीव्र शब्दांत सत्ताधारी सरकारचा निषेध यावेळी करण्यात आला. या निषेध आंदोलनात ठाकरेंचे कुटुंबीय सहभागी झालेले दिसले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर बोचऱ्या शब्दांत टीका केली.