
कर्दे येथे समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
दापोली : कर्दे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील सहापैकी एक तरुण समुद्रात बुडाल्याची दुर्घटना रविवारी दि. 9 रोजी दुपारी घडली होती. सौरभ घावरे असे या तरुणाचे नाव असून सोमवार दि. 10 रोजी सकाळच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह कर्दे समुद्रकिनार्यावर आढळून आला. या बाबत मृत सौरभच्या वडिलांनी दापोली पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
कार्तिक घाडगे (20), यश घाडगे (19), दिनेश चव्हाण (20), अक्षय शेलार (19), कुणाल घाडगे (30, सर्व रा. एकसर, तालुका वाई, सातारा, तर सौरभ घावरे (18, रा. बेलुशी, ता जवळी, जि. सातारा) असे सहा पर्यटक कर्दे येथे दुचाकी वाहने घेऊन आले होते. दुपारी 12 वा. च्या सुमारास ते सर्वजण पोहण्यासाठी समुद्रात गेले असताना ही दुर्घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच वडील प्रकाश घावरे हे रविवारी रात्री दापोलीत दाखल झाले होते. दरम्यान, या दुर्घटनेत सोमवारी समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या सौरभचा मृतदेह आढळून आल्यावर त्यांनी दापोली पोलिस ठाण्यात याबाबत खबर दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गोरे हे करीत आहेत.




