
तीन वर्षे झाले तरी कोर्टात न्याय मिळत नसेल तर सुप्रीम कोर्टाला टाळं लावायला पाहिजे,- संजय राऊत
संजय राऊतांनी महायुती सरकार, मोदी सरकार आणि न्यायालयावरही हल्लाबोल केला. शिवसेनेतील फुटीनंतर 40 आमदारांच्या अपात्रेसंदर्भात न्यायलयीन लढा सुरू असून अद्यापही त्यावर निर्णय न झाल्याने संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. कारण, न्यायालयाकडून याप्रकरणावरील अंतिम सुनावणीलाही तारीख पे तारीख मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 शिवसेना आमदारांनी महायुतीसोबत सरकार स्थापन केले. त्यामुळे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह व 40 आमदारांच्या अपात्रेबाबत न्यायालयीन लढाई सुरू केली आहे. मात्र, या दोन्ही निर्णयावर अद्यापही सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी झाली नाही. त्यामुळे, न्यायालयाकडून होत असलेल्या विलंबावर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे सातत्याने भाष्य करताना दिसून येतात. तर, आता संजय राऊत यांनी थेट सर्वोच्च न्यायालयास टाळं ठोकण्याची भाषा केली आहे. अंधा कानूनचे डोळे काढण्याची वेळ आली आहे, तीन वर्षे झाले तरी कोर्टात न्याय मिळत नसेल तर सुप्रीम कोर्टाला टाळं लावायला पाहिजे, हे सरकार घटनाबाह्य असल्याचे नायाधीश सांगत आहेत, मात्र निकाल देत नाहीत, हा अंधा कानून आहे, अशा शब्दात खासदार संजय राऊतयांनी न्यायालयीन प्रक्रियेतील दिरंगाईवर संताप व्यक्त केला आहे.