खेड रेल्वेस्थानकाचा गणेशोत्सवापूर्वी लूक पूर्णपणे पालटण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम खात्याकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी, कणकवली पाठोपाठ येथील रेल्वेस्थानकाचाही लूक लवकरच पालटणार आहे. रेल्वेस्थानक परिसरातील कॉंक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत सुशोभिकरणासह अंतर्गत कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या कामांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर झाला आहे.गेल्या चार महिन्यांपासून रेल्वेस्थानकाच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात जुन्या रस्त्यांची खोदाई करून दुहेरी कॉंक्रीटीकरण करण्यात आले. सद्यस्थितीत रेल्वेस्थानकाला आधुनिक टच देण्याचे काम हाती घेण्यात आले. प्रवाशांना बसण्यासाठी प्रशस्त जागेसह सोयीसुविधांची पूरक प्रमाणात उपलब्धताही केली जाणार आहे.प्रवाशांच्या विरंगुळ्यासाठी परिसरात पाण्याच्या वाहत्या धबधब्याची निर्मिती करण्यात येणार आहे. रिक्षा उभ्या करण्याकरिता स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय प्रवाशांच्या चारचाकी वाहनांसह दुचाकीस्वारांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्थाही करण्यात येणार आहे. ही सर्व अंतर्गत गामे वेगाने सुरू आहेत. गणेशोत्सवापूर्वी रेल्वेस्थानकाचा लूक पूर्णपणे पालटण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम खात्याकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. www.konkantoday.com