
मडगाव ते मुंबईतील वांद्रे टर्मिनस मार्गावर आठवड्यातून दोनदा धावणारी नवीन रेल्वे गाडी लवकरच सुरू होणार
मडगाव ते मुंबईतील वांद्रे टर्मिनस मार्गावर आठवड्यातून दोनदा धावणारी नवीन रेल्वे गाडी लवकरच सुरू होणार आहे. या कायमस्वरूपी गाडीचा प्रस्ताव २१ ऑगस्ट रोजी रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावानुसार ही गाडी मंगळवारी आणि गुरुवारी मडगाव ते वांद्रे टर्मिनस या मार्गावर धावणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी बुधवार आणि शुक्रवारी धावेल. आठवड्यातून दोनदा धावणारी ही गाडी मडगाव येथून सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी सुटून रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. वांद्रे येथून ही गाडी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी सुटून रात्री दहा वाजता ती गोव्यात मडगावला पोहोचेल, असे नियोजन करून रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. मुंबईतून पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून कोकणात येणारी कायमस्वरूपी गाडी नसल्यामुळे कोकणवासीयांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सध्या आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी चालवण्यात येणार आहे. वांद्रे टर्मिनस येथून सुटल्यानंतर ही गाडी वसई, भिवंडी, पनवेल, रोहा, मार्गे मडगावला जाईल. रेल्वे बोर्डाकडून हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर गाडीचे थांबे जाहीर केले जातील.