
न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखला पाहिजे, म्हणून आम्ही उद्याचा बंद मागे घेत आहोत-उद्धव ठाकरे
महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. तसेच, राजकीय पक्षांना कुठलाही बंद पुकारता येत नाही, असे निर्देश देत उद्याचा बंद मागे घेण्याचेही न्यायालयाने आदेश दिले होते.त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या उद्याच्या बंदबाबत भूमिका जाहीर करत आपण हा बंद मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. शरद पवार यांच्याकडून उद्या सकाळी पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बसून सकाळी 10 ते 11 या वेळेत सहवेदना व्यक्त करण्यात येणार आहेत. येथे एक तास बसून बदलापूर घटनेचा निषेध नोंदविण्यात येईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही बंदबाबत भूमिका जाहीर केली असून बंदऐवजी एक तासभर राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भूमिका मांडत उद्याचा बंद मागे घेण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, पण न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखला पाहिजे, म्हणून आम्ही उद्याचा बंद मागे घेत आहोत, असेउद्धव ठाकरे यांनी म्हटलं. त्यामुळे, महाविकास आघाडीकडून बंदचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे स्पष्ट झालं आहे. www.konkantoday.com