शेतात कुंपण घालण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर डुकराचा हल्ला शेतकरी जखमी
संगमेश्वर तालुक्यातील पाचांबे नेरदवाडी येथील संतोष महादेव सावंत (४६) हे शेतात कुंपण घालण्यासाठी गेले असता अचानक रानडुकराने हल्ला केल्याने त्यात सावंत हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. हा प्रकार चार दिवसांपूर्वी घडलाजखमी संतोष सावंत त्यांच्या घरानजीक असलेल्या शेतात रानटी प्राणी येऊन शेताची नासधूस करत असल्याने ते १६ ऑगस्ट रोजी सकाळी शेताला कुंपण घालण्यासाठी गेले होते. कुंपण घालत असता दुपारी १ च्या सुमारास अचानक समोरून येत रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात संतोष यांच्या डाव्या पायाच्या मांडीमध्ये डुकराचा सुळा घुसल्यावर त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला, मात्र डुकराने परत हल्ला चढवला.यानंतर डुकराने पळ काढला. या हल्ल्यात संतोष यांच्या उजव्या बाजूला मुका मार लागला तर उजव्या बगलेत मोठी जखम झाली. संतोष हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. ते मदतीसाठी ओरडत होते, त्यावेळेस रस्त्याने जाणारे दत्ताराम झोरे यांनी त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकल्याने त्यांनी जाऊन पहिले असता सावंत हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. संतोष यांना ग्रामस्थानी तत्काळ १०८ या रुग्णवाहिकेला कॉल करुन बोलावून त्यांना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तेथे उपचार करण्यात आले