विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीला कोल्हापूर जिल्ह्यात खिंडार
भाजपबरोबर राहूनही बदललेल्या राजकीय परिस्थितीत विधानसभेसाठी पक्षाची उमेदवारी मिळणे कठीण असल्याने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व शाहू सहकार समूहाचे सर्वेसर्वा समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम करण्याचे ठरविले आहे.आपली राजकीय भूमिका जाहीर करण्यासाठी 23 ऑगस्ट रोजी त्यांनी आपल्या गटाचा मेळावा बोलावला आहे. त्यावेळी ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत. दरम्यान, अशाच राजकीय कोंडीतून बाहेर पडण्यासाठी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनीही प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा पाठविला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीला जिल्ह्यात खिंडार पडले आहे.