रामगिरी महाराजांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना समज द्या – मराठी मुस्लिम सेवा संघ
पुणे : ‘रामगिरी महाराज याने महम्मद पैगंबर यांच्या संदर्भात वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखवून समाजात तेढ निर्माण केला आहे. त्यांना पाठीशी घालण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.*अशा परिस्थितीत राज्यपालांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समज द्यावी’, अशी मागणी मराठी मुस्लिम सेवा संघाने राज्यपालांकडे केली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांना निवेदन पाठवून ही मागणी करण्यात आली आहे. फकीर मोहम्मद ठाकूर (अध्यक्ष ,मराठी मुस्लिम सेवा संघ), इब्राहिम खान( पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, मराठी मुस्लिम सेवा संघ),जावेद शेख( पुणे शहर अध्यक्ष,मराठी मुस्लिम सेवा संघ) यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.रामगिरी महाराज याने पैगंबर महम्मद सल्लाहुअलैहीसल्लम यांचेविषयी केलेल्या फाजील वक्तव्या मुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावलेल्या असतानाच ‘रामगिरी महाराजाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही’ हे विधान करून रामगिरी महाराजाचा बोलविता धनी एकनाथ शिंदे हेच आहेत असे सिद्ध करीत आहेत. हे धक्कादायक आहे. ज्यांच्यावर राज्यात शांतता राखण्याची जबाबदारी आहे, त्यांनीच दंगली घडविण्याच्या कारस्थानाचा भागीदार असल्या सारखे वागणे धोकादायक आहे ,याची आपण नोंद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समज देवून मुस्लिम समाजाची माफी मागण्यास भाग पाडावे,’,असे राज्यपालांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. ‘ त्यांनी माफी / दिलगिरी व्यक्त न केल्यास आपण भारतीय संविधानाचा आदर राखून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करून राजधर्माचे पालन करावे ,अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.