मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाव्याला ठाकरे गटाचे किरण माने यांचे आव्हान
* बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत.राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवला जाणार असल्याची माहिती राज्य सरकारमधील काही नेत्यांनी दिली आहे. पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपीला फाशीची शिक्षा होईल, असं वक्तव्य केलं आहे.एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रत्नागिरीच्या चंपक मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कर्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात केलेल्या भाषणात शिंदे म्हणाले, “बदलापूरमध्ये घडलेली घटना खूप दुर्दैवी आहे. या प्रकरणातील आरोपीली फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात मुलींच्या भावनेशी खेळणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. याप्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवला जाणार असून गुन्हेगाराला लवकरात लवकर कठोर शासन केलं जाईल. त्याचबरोबर संस्था चालकांवरही कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. अशा नराधमांचे हात कलम करण्याचा, छाटून टाकण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघेंचा वारसा सांगणारा महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही”.दरम्यान, या भाषणात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून अभिनेते व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पदाधिकारी किरण माने यांनी टोला लगावला आहे. माने म्हणाले, “एकनाथ शिंदेंनी दावा केला आहे की चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात एका नराधमाने बलात्कार केला व दोन महिन्यांपूर्वी त्याला फाशीची शिक्षा झाली. महाराष्ट्रात दोन महिन्यांपूर्वी कोणाला फाशी झाली आहे हे कोणी सांगू शकेल का?”किरण माने यांनी फेसबूकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “मुख्यमंत्री आज भाषणात म्हणाले, ‘चार महिन्यापुर्वी महाराष्ट्रात एका आरोपीने बलात्कार केला होता. आम्ही फास्टट्रॅक खटला चालवला. दोन महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा झाली’. इतकी जबरदस्त थाप मारलेली मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकली! कुणी सांगू शकेल का गेल्या चार महिन्यात महाराष्ट्रात कुणाला फाशीची शिक्षा झालेली आहे? इतक्या संवेदनशील विषयावर अशा थापा मारणारा नराधम माणूस म्हणवून घ्यायच्या लायकीचा नाही”.