मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरीतील कार्यक्रमाकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपच्या स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली
माजी मंत्री तथा शिवसेना नेते रामदास कदम आणि भाजपमधील वाद मिटायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. कारण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरीतील कार्यक्रमाकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली.त्यामुळे भाजप-शिवसेनेतील वाद कोकणात चांगलाच पेटल्याचे दिसून येत आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा रत्नागिरी येथे बुधवारी कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि स्थानिक भाजप नेते उपस्थित राहणार होते. मात्र, ह्या सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाकडे चक्क पाठ फिरवली. विशेषतः रवींद्र चव्हाण यांनी कार्यक्रमाला न येणे विशेष चर्चेचे ठरले आहे.सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला. याबाबत एका भाजप पदाधिकाऱ्याने सांगितले की, आमचे नेते कार्यक्रमाला आले नाहीत, त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या कार्यक्रमाला गेलो नाही. त्यामुळे रामदास कदम यांच्या आरोपामुळे भाजपचे नेते आणि पदाधिकारी चांगलेच दुखावल्याचे दिसून येत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, महिला व बाल कल्याणमंत्री अदिती तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार शेखर निकम रत्नागिरीत बुधवारी (ता. २१ ऑगस्ट) झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र, भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार हेही अनुपस्थित होते. विशेष म्हणजे मंत्री चव्हाण यांचा शासकीय दौराही आला होता. मात्र, ऐनवेळी ते कार्यक्रमाला आले नाहीत.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रवींद्र चव्हाण हे धैर्यशील पाटील यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुंबईत थांबल्याचे सांगण्यात आले. मात्र, भाजप नेतेच न आल्याने कार्यकर्त्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या फ्लेक्सवर भाजप नेत्यांचे फोटो आणि शहरातील रस्त्यावर झेंडेही लावण्यात आलेले आहेत.