मुंबई गोवा महामार्ग का होत नाही, त्या मागची कारणे काय आहेत हे रामदास कदम यांना माहित आहे- नितेश राणे
कोकणात महायुतीतचे नेते रामदास कदम आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यातील वाद शमण्याचे नाव घेत नाही. मुंबई गोवा महामार्गावरून कदम यांनी चव्हाण यांच्यावर जोरदार टिका केली आहे.त्यांच्यातील या वादात आत नितेश राणे यांची एन्ट्री झाली आहे. त्यांनी यावेळी रामदास कदम यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. आपसात भांडून काही होणार नाही. निवडणुकीच्या काळात भाजपच्या मतांशिवाय मित्रपक्षांचे उमेदवार निवडून येणार नाहीत असे वक्तव्य करत कदमांना सुचक इशाराच दिला आहे.मुंबई गोवा महामार्ग हा राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही. तो केंद्र सरकारकडे आहे. जर हा महामार्ग राज्य सरकारकडे असेल तर तसे कदम यांनी दाखवून द्यावे असे आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यात चव्हाण यांची कोणतीही चुक नाही. उलट त्यांनी अनेक वेळा मुंबई गोवा महामार्गाच्या कामात लक्ष घातले आहे. अधिकाऱ्यांकडून काम करून घेतले आहे. अशा स्थितीत त्यांच्यावर आरोप करणे हे चुकीचे आहे असे राणे म्हणाले.नितेश राणे ऐवढ्यावर थांबले नाहीत. येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुका भाजपच्या मतां शिवाय मित्र पक्षांना जिंकता येणार नाहीत, असा इशाराच त्यांनी रामदास कदम यांना दिला आहे. त्यामुळे आपण आपसात भांडून काही उपयोग नाही. आमचा खरा शत्रू हा महाविकास आघाडी आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात लढणे गरजेचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. कदम यांनी या आधीही रविंद्र चव्हाण यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे.मुंबई गोवा महामार्ग का होत नाही, त्या मागची कारणे काय आहेत हे रामदास कदम यांना माहित आहे असे नितेश राणे म्हणाले. महायुतीतल्या कोकणातील सर्व नेत्यांनी महामार्गावर उतरून महामार्ग पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विनायक राऊत हे याआधी खासदार होते. त्यांच्या काळात हा महामार्ग झाला नाही. त्यामुळेच जनतेने यावेळी नारायण राणे यांना निवडून दिले आहे. हा महामार्ग तातडीने मार्गी लागावा यासाठी राणेंनी नितिन गडकरी यांची भेट घेतली आहे. त्यांच्या सोबत बैठकाही झाल्या आहेत असे नितेश राणे म्हणाले.