
भजन प्रेमींनी गणेश उत्सवातील भक्तिरसात न्हाऊन भजन कला वृद्धिंगत करावी
ज्येष्ठ नागरिक कट्टाच्या १६ व्या भजन कला मेळाव्यात बुवा प्रकाश वराडकर यांचे मार्गदर्शन**रत्नागिरी प्रतिनिधी*: गणेशोत्सव कोकणात अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. या उत्सवात गावोगावी, वाडी वाडीतील भजन मंडळे श्री गणेशाच्या भजनात रंगून जातात. भजन कलेचा बहर या उत्सवात दिसून येतो. यंदाही ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून भजन केलेला बहर येणार आहे. त्यामुळे भजन प्रेमींनी गणेश उत्सवातील भक्तिरसात न्हाऊन निघावे. भजन मंडळातील कलावंतांनी उत्सवातील भजन सादरीकरणात श्री गणरायाची आराधना करावी, आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा. भजन कला वृद्धिंगत करावी. भक्तीचा महापूर आणण्याचे सामर्थ्य भजनी कलेत आहे, असे प्रतिपादन भजन कला मार्गदर्शक भजनी बुवा प्रकाश वराडकर यांनी केले. श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा तर्फे श्रीराम मंदिर रत्नागिरी येथे आयोजित १६ व्या भजनी कलावंत मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. रत्नागिरी येथील श्रीराम मंदिरात श्रीराम मंदिर जेष्ठ नागरिक कट्ट्याच्या वतीने बुवा श्री प्रकाश वराडकर यांनी अकराव्या भजनी मेळाव्यात भजनी कलावंतांना मार्गदर्शन केले. यावेळी भजनी मेळाव्याला सुरुवात केल्यानंतर कट्ट्याचे सचिव समाज भूषण श्री सुरेंद्र घुडे, उल्हासराव लाड, दिलीपराव साळवी, रमाकांत पांचाळ, बापू घोसाळकर, अनुया बाम, माधवी साळवी, चंद्रकांत मेवाळकर, राजन भाटकर, शिवराम कदम या या भजनी कलावंतांनी अभंग, गवळण, गजर अशी विविध भजने सुरेल आवाजात सादर करून भजनी मेळाव्यात रंग भरला. त्यांना हार्मोनियम साथ बुवा सुरेंद्र घुडे यांनी केली. मृदंग राजन भाटकर, चकवा दिलीपराव साळवी, सुरेंद्र शेटे व साक्षी भागवत यांनी दिली. शेवटी बुवा प्रकाश वराडकर यांनी विठू नामाचा गजर सादर करीत मेळाव्याचा समारोप करण्यात आला. पुढील मेळावा शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी होणार असून या मेळाव्यातही प्रकाश बुवा वराडकर मार्गदर्शन करणार आहेत. कट्ट्याचे प्रमुख संयोजक श्री. सुरेश उर्फ अण्णा लिमये यांनी प्रास्ताविक तर शेवटी सचिव श्री. सुरेंद्र घुडे यांनी आभार मानले