
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने स्यूमोटो कारवाई केली
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने स्यूमोटो कारवाई केली आहे. कोर्टाने स्वत: या प्रकरणाची दखल घेऊन सुनावणी घेतली आहे. या सुनावणीवेळी कोर्टाने शाळा प्रशासन आणि पोलिसांना कडक शब्दात खडेबोल सुनावले आहेत.एकाच मुलीचं स्टेटमेंट घेतलं. दुसऱ्या मुलीचं स्टेटमेंट का घेतल नाही? आजच्या आज दुसऱ्या मुलीचं स्टेटमेंट रेकॉर्ड करा, असे आदेशच मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलिसांना दिले आहेत. तसेच ज्या मुलीचे स्टेटमेंट नोंदवले गेले, तिचे हे स्टेटमेंट रेकॉर्ड केलंय का? असा सवालही कोर्टाने यावेळी केला आहे.न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू आहे. यावेळी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ हे सरकारकडून बाजू मांडत आहेत. तर एसआयटीच्या प्रमुख आरती सिंग आणि सुधाकर पठारे हे अधिकारी सुद्धा कोर्टात उपस्थित आहेत. यावेळी महाधिवक्त्याची बाजू ऐकतानाच कोर्टाने पोलिसांना चांगलंच फटकारलं आहे. तसेच शाळा प्रशासनाच्या गलथान कारभारावरही आसूड ओढले आहेत.आम्ही कारवाई केली आहे, असं तुम्ही सांगत आहात. पण इतक्या उशिराने कारवाई करून काय उपयोग? असा सवाल करतानाच या प्रकरणात शाळा संचालकांनीही काहीच लक्ष दिलं नाही. दुसऱ्या मुलीचंही स्टेटमेंट रेकॉर्ड झालं पाहिजे होतं. तेही करण्यात आलं नाही. त्या दुसऱ्या मुलीचं स्टेटमेंट आजच्या आजच रेकॉर्ड करा, असे आदेशच न्यायाधीश चव्हाण यांनी दिले आहेत. काहीही न बघता इथे काहीही सांगू नका, असा शब्दात कोर्टाने महाधिवक्त्यांना फटकारलं.