महायुतीच्या नेत्यांनी आरोप प्रत्यारोप करणे योग्य नाही- पालकमंत्री उदय सामंत
महायुतीच्या नेत्यांनी आरोप प्रत्यारोप करणे योग्य नाही. दोन्ही नेत्यांचे जे काही समजगैरसमज झाले असतील ते त्यांनी बसवून मिटवले पाहिजेत. वरिष्ठांनी बोलून दोघांनी यातून तोडगा काढला पाहिजे, या दोन नेत्यांमधील वाद म्हणजे मविआला ताकद दिल्यासारखी असल्याची स्पष्ट भूमिका शिवसेना नेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. रत्नागिरी दौर्यावर असलेल्या सामंत यांनी महायुतीच्या नेत्यांबाबतच्या वादंगाबाबत छेडले असता ते बोलत होते. रामदास कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या मतदार संघामधील कामामुळे काही गैरसमज झाला असेल तर त्यांनी तो बोलून सोडवायला पाहिजे होता. त्यांचे सुपुत्र योगेश कदम यांच्या मतदार संघात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काही अतिरिक्त निधी दिला गेल्याची चर्चा आहे. यावर बोलून चर्चा करुन मार्ग काढायला हवा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन हे समजगैरसमज दूर केले पाहिजेत असे सामंत यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे आपले सहकारी आहेत, भाजपाचे नेते आहेत. त्यांनीही त्यांच्या विभागामार्फत विकास कामे करण्याचा प्रयत्न केला आहे हे नाकारता येणार नाही. गतवर्षी त्यांनी मुंबई गोवा महामार्गाची एक लेन पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अनेकवेळा त्यांनी महामार्गावरुन यासाठी प्रवास केला आहे. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये वाद होणे हे महाविकास आघाडीला ताकद देण्यासारखे आहे