मुख्यमंत्री यांच्या संभाव्य दौऱ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
रत्नागिरी, : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दि. 21 ऑगस्ट रोजी संभाव्य दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी विविध विभाग प्रमुखांकडून आढावा घेतला. या बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, दौऱ्यामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमाच्या ठिकाणी रुग्णवाहिका, अग्निश्यामक दल, फिरते स्वच्छता गृह यांची सुविधा ठेवावी. त्याचबरोबर पोलीस विभागाने पार्कींगची व्यवस्था करावी, वाहतुकीचे नियमन करावे. पाणी, ओआरएस पॅकेट, फूड पॅकेट आदिंचीही चोख व्यवस्था करावी. दिलेली प्रत्येक जबाबदारी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून पार पाडावी. *आधार लिंकसाठी गर्दी होणार नाही याचे नियोजन करा* मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या काही बँकांमध्ये केवायसी करण्यासाठी तसेच आधार लिंकसाठी महिलांची गर्दी होत आहे. याबाबत त्यांची गैरसोय होणार नाही, ही गर्दी कमी करण्याच्या दृष्टीकोनातून बँकांनी नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी अग्रणी बँक व्यवस्थापकांना दिली. पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पुजार यांनीही महाराष्ट्र शासनाच्या फ्लॅगशिप योजना, त्यांचे लाभार्थी, होणारी गर्दी, त्याचे नियंत्रण याबाबत सूचना दिल्या.