आई बापांनी जन्माला घातलं म्हणून उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं चालतं का?” अजित पवार यांची संजय राऊत यांच्यावर टीका
कोण आम्हाला शिव्या देतंय, कोण आम्हाला शाप देतंय तर कोण कोणाला सरडा म्हणतंय अन् कोण कोणाला ढेकूण म्हणतंय. पण सरडा आणि ढेकूण म्हणून राज्याचा कायापालट होणार आहे का?” असा प्रश्न उपस्थित करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.अजित पवारांच्या गुलाबी कॅम्पेनवरुन टीका करताना संजय राऊत यांनी अजित पवारांचा उल्लेख सरडा असा केला होता. आता राऊतांच्या याच टीकेला अजितदादांनी प्रत्युत्तर दिलं आहे.जनसन्मान यात्रेत बोलताना अजित पवार म्हणाले, “कोण आम्हाला शिव्या देतंय, शाप देतंय तर कोण कोणाला सरडा म्हणतंय तर कोण कुणाला ढेकूण म्हणतंय. पण ढेकूण आणि सरडा म्हणून राज्याचे प्रश्न सुटणार आहेत का? राज्याचा कायापालट होणार आहे का? याचं उत्तर विरोधकांनी द्यावं. उगाच आई बापांनी जन्माला घातलं म्हणून उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं चालतं का?” अशा शब्दात त्यांनी राऊतांचा समाचार घेतला.