मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील ९५ टक्के गळती रोखण्यात यश
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात ठिकठिकाणी लागलेली गळती थोपवण्याचे काम सद्यस्थितीत ९५ टक्के पूर्ण झाले आहे. ग्राऊटींगद्वारे सुरू असलेल्या कामासाठी आतापर्यंत ३ हजाराहून अधिक सिमेंट बॅगांचा वापर करण्यात आला आहे. यासाठी १५ कामगारांची दोन पथके कार्यरत आहेत. गणेशोत्सवापूर्वी राहिलेली किरकोळ गळती थोपविण्याची कामे पूर्ण होवून बोगदा वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षित होईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.कशेडी बोगद्यात आठ ठिकाणी लागलेली गळती थांबविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने तातडीने ग्राऊटींगचे काम हाती घेतलेे. अत्याधुनिक यंत्रणांच्या सहाय्याने लागलेल्या गळतीच्या ठिकाणी सिमेंट टाकून पाणी अन्य मार्गे वळवण्यात आले. याशिवाय मुंबई येथील आयआयटी विभागाचे प्रा. एस. के. यांनी बोगद्याची प्रत्यक्ष पाहणी करत उपाययोजनांच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग खात्याला सूचना केल्या होत्या. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग खात्याने गळती रोखण्याच्या कामाला गती दिली होती. सद्यस्थितीत ३ हजाराहून अधिक सिमेंट बॅगांचा वापर करून ९५ टक्के गळती थोपवण्यात यश आल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग खात्याने केला आहे. www.konkantoday.com